सेन्सेक्स 78 अंकांनी घसरणीत : व्होडाफोन 7 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी जागतिक बाजारात मिळताजुळता कल राहिल्याने याचा दबाव भारतीय बाजारात राहिल्याचे दिसून आले. यावेळी सेन्सेक्स 78 अंकांनी तर निफ्टी 9.85 अंकांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत.
मुख्य घडामोडींमध्ये व्होडाफोन आयडियाचे समभाग हे तब्बल 7 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासह धातू क्षेत्राचे समभाग हे वधारले तसेच आयटीचे समभाग घसरणीत राहिले आहेत. भारतीय बाजारात मंगळवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 78.22 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 65,945.47 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 9.85 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,664.70 वर बंद झाला.
मंगळवारी सेन्सेक्सचे 30 मधील 15 समभाग हे वधारले आहेत. तर 15 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. सेन्सेक्समध्ये नेस्ले, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, टीसीएस यांचे समभाग वधारले आहेत. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.
टॉपच्या कामगिरीमध्ये कोचीन शिपयार्डचे समभाग हे 12.30 टक्क्यांवर वधारले होते. तर ओमॅक्सचे समभाग 8.98 टक्क्यांनी वधारले तर अशोका बिल्डकॉनचे समभाग हे 8.56 टक्क्यांनी तेजीत राहिले. एनसीसी लिमिटेडचे समभाग 5.97 टक्क्यांनी तेजीत राहिले. याच दरम्यान व्होडाफोन आयडियाचे समभाग 7.55 टक्क्यांनी वधारले आहेत.
बाजाराचे लक्ष आगामी प्रवासाकडे
भारतीय भांडवली बाजाराचे लक्ष हे आता आगामी काळात जागतिक पातळीवरील स्थितीवर निश्चित होणार असल्याचे संकेत शेअर बाजार अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेत आपली आगामी वाटचाल करावी लागणार आहे.