प्रतिनिधी /बेळगाव
पहिल्या गुरुवारच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. खरेदीसाठी गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दिवाळीनंतर काही दिवस शहरातील वर्दळ काहीशी कमी झाली होती. मात्र, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच गुरुवारच्या पूर्वसंध्येला गर्दी दिसून आली.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला गुरुवारदिवशी लक्ष्मी देवीची पूजा करतात. त्यामुळे पूजेसाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच उपनगरांतील जनता मुख्य बाजारपेठेकडे येते. बुधवारी सायंकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. यावेळी नरगुंदकर भावे चौक येथे बराच उशीर वाहतुकीची कोंडी झाली होती. काही विपेत्यांनी आणि फेरीवाल्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. अनेक ठिकाणी वाहने पार्किंग झाल्याने कोंडीत भर पडली होती.
आता लग्नसराई तसेच इतर कार्यक्रमांची लगबगही सुरू झाली आहे. या महिन्यामध्ये अनेक जण गृहप्रवेश करत असतात. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी झालेली असते. आताही गर्दी वाढत असून बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. वाहतुकीची कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी पोलिसांना मोठी धडपड करावी लागत होती.