काँग्रेस रोडवरील अपघातात तिघे जण जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
रस्त्याशेजारी थांबलेल्या दुचाकीला धडकून दूधवाहू वाहन कलंडल्याने सुमारे 12 हून अधिक कॅनमधील दुधाची नासाडी झाली. शनिवारी सकाळी काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिराजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरील मायलेकरासह तिघेजण जखमी झाले आहेत.
सोनल कपिल काळभैरव (वय 35), त्यांचा मुलगा पुष्कर (वय 5) दोघेही राहणार टिळकवाडी अशी दोघा जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. दूधवाहू वाहनचालकही जखमी झाला असून त्याचा तपशील मिळू शकला नाही.
सोनल दुचाकीवरून आपल्या मुलाला शाळेतून घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी काँग्रेस रोडवरून जाणाऱ्या दूधवाहू टाटा येसने एका दुचाकीला चुकविण्याच्या भरात सोनल यांच्या वाहनाला ठोकरून कलंडले. वाहनात सुमारे 12 हून अधिक कॅनमध्ये भरलेले दूध खाली सांडले. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर दूधवाहू वाहन नागरिकांनी उचलून बाजूला केले. तोपर्यंत रस्त्याभर दूध पसरले होते.