अवेक्षक श्रीरंग नादरगी यांना बघून घेण्याची धमकी; नगरोत्थान योजनेतील 44 कामांच्या टेंडर प्रक्रियेवेळी कार्यालयातच गोंधळ
प्रतिनिधी / सोलापूर
महापालिका नगर अभियंता रस्ते विभाग कार्यालयात कामे घेण्याच्या कारणावरून मक्तेदारांचा एकमेकांसोबत राडा झाला. नगरोत्थान योजनेतील 44 कामांच्या टेंडर प्रक्रियेवेळी कार्यालयातच गोंधळ निर्माण झाला. महापालिकेचे अवेक्षक श्रीरंग नादरगी यांना थेट बघून घेण्याची धमकी दिली. यामुळे महापालिका वर्तुळात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
सोलापूर महानगरपालिका नगर अभियंता कार्यालय रस्ते विभागाच्या वतीने नगरोत्थान योजनेतील 130 कामांपैकी 15 लाखांच्या आतील अंदाजे 3.5 ते 4 कोटींच्या, 44 कामांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या टेंडर प्रक्रियेमध्ये शहरातील जवळपास 80 मक्तेदारांनी सहभाग नोंदवून कागदपत्रे दाखल केली आहेत.
नगर अभियंता रस्ते विभाग कार्यालयातील अवेक्षक श्रीरंग नादरगी यांनी मक्तेदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी केली. या छाननीमध्ये अनेक मक्तेदारांनी अपुरी कागदपत्रे दाखल केली होती. यामुळे अवेक्षक नादरगी यांनी सर्व 80 मक्तेदारांना पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कळवले होते. त्यानुसार गुऊवारी कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, काही मक्तेदार परगावी असल्यामुळे त्यांना कागदपत्रे दाखल करता आली नाहीत. यामुळे त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
गुऊवारी कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने मक्तेदारांनी नगर अभियंता रस्ते विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी कामे घेण्याच्या कारणावरून रविराज कन्स्ट्रक्शन आणि डीबी कन्स्ट्रक्शन यांच्यामध्ये कार्यालयातच प्रचंड वाद झाला आणि या वादात मक्तेदारांनी महापालिकेचे अवेक्षक श्रीरंग नादरगी यांनाच तुला बघून घेऊ अशी धमकी दिली. यामुळे नादरगी घाबरलेल्या अवस्थेत कार्यालय सोडून निघून गेले.
कार्यालयातील मक्तेदारांचा हा राडा पाहून कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी गोंधळून गेले. यावेळी उपअभियंता तपन डंके यांनी मध्यस्ती करून मक्तेदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या पलीकडे प्रकरण गेल्याने अखेर तपन डंके हे ही आपल्या कार्यालयातून निघून गेले. टेंडर प्रक्रियेच्या वेळी रस्ते विभाग कार्यालयात मक्तेदारांचा गोंधळ असतो. यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजातही व्यत्यय येतो.