महिला मोर्चा प्रभारी सुलक्षणा सावंत यांचे प्रतिपादन
पणजी : महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय घेता येत नाही म्हणून काँग्रेसचा जळफळाट झाला असून त्यातूनच ते त्रुटी शोधून टीका करत आहेत, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी केला आहे. काल शुक्रवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार डिलायला लोबो, कायदा सल्लागार सुलेखा शेट्यो, सरचिटणीस अनिता कवळेकर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांची उपस्थिती होती.
महिलांना मोदींची अनोखी भेट
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण मिळविण्याच्या ज्या क्षणाची आम्ही वाट पहात होतो ते ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक अखेर मंजूर झाले आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर नव्या संसद भवनातून कामकाज प्रारंभ करण्यात आले आणि सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयक मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना अनोखी भेट दिली आहे, असेही सौ. सावंत म्हणाल्या.
वेगळ्या युगाचा प्रारंभ
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पोहोचलेलो असताना मंजूर करण्यात आलेले हे विधेयक म्हणजे एका वेगळ्या युगाचा प्रारंभ आहे. भाजपकडून नारी शक्तीचा झालेला हा खरा सन्मान आहे, असे त्या म्हणाल्या. भाजप महिला मोर्चामुळे राज्यात असंख्य महिलांची राजकीय कारकीर्द प्रारंभ झाली. यापुढे आता 33 टक्के आरक्षणामुळे त्यांना अधिक बळ मिळणार असून महिलांची राजकारणातील संख्या कैक पटीनी वाढण्यास मदत होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपने सातत्याने महिला आरक्षण विधेयक आणण्याचे प्रयत्न चालविले होते. ते आता सफल झालेले आहेत. महिला सशक्तीकरणाच्या अनेक योजनाही जनतेपर्यंत पोहोचविलेल्या आहेत. मात्र महिला आरक्षण विधेयकामुळे आता राजकीय पटलावर स्वतंत्र ओळख आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहे, असे त्या म्हणाल्या.
ओबीसीलाही राखीवता मिळणार : सावंत
या विधेयकात ओबीसीसाठी राखीवता ठेवण्यात आली नसल्याचे नजरेस आणून दिले असता, सर्व गोष्टी एकाच दमात पूर्ण होत नसतात, असे सांगून भविष्यात ओबीसीचाही त्यात समावेश होईल, असे सांगितले. अॅड. शेट्यो यांनी विधेयकातील काही महत्वाच्या मुद्यांचा आढावा घेताना हे विधेयक महिलांसाठी प्रचंड लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. डिलायला लोबो यांनी बोलताना, गत कित्येक वर्षांपासून दरवर्षी आम्ही महिला दिवस साजरा करत होतो, तेव्हा प्रत्येकवेळी महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असे. परंतु आजपर्यंत ते केवळ एक स्वप्नच राहिले होते. आता भाजप सरकारमुळे खऱ्या अर्थाने ते स्वप्न सत्यात उतरले असून देशातील असंख्य महिलांना पुऊषांशी स्पर्धा न करता राजकारणात उतरणे शक्य होणार आहे, असे त्या म्हणाल्या. सौ. तेंडुलकर यांनीही विचार मांडले. स्वानुभव कथन करताना त्यांनी, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा पाठबळ नसताना केवळ एक बूथ कार्यकर्ता म्हणून आपण राजकारणात उतरले आणि एकेक पायरी वर चढत आज जिल्हा पंचायत अध्यक्षापर्यंत मजल मारली आहे, हे केवळ भाजपमुळे शक्य झाले असून भविष्यात आपणासारख्या हजारो महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचेही राजकारणात उतरण्याचे स्वप्न साकार होण्यात मदत होईल, असे त्या म्हणाल्या.