जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरोघरी राष्ट्रध्वजाचे वाटप; आजपासून सुरु होणार स्वातंत्र्याचा सण; जिल्ह्यात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी
कृष्णात चौगले / कोल्हापूर
गतवर्षी संपूर्ण राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा ) उपक्रम राबविण्यात आला होता. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी देखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राज्यात सर्वत्र राबविला जाणार आहे. मागील वर्षी घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत खरेदी केलेले ध्वज व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. तरीही ध्वजसंहितेच्या काटेकोर पालनासाठी जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी १५ ऑगस्टनंतर सर्व ध्वज संकलित करून कार्यालयात ठेवले होते. तसेच कुटूंब संख्येच्या तुलनेत कमी असणारे ध्वज पोस्ट कार्यालयासह स्थानिक पातळीवरून खरेदी केले आहेत. या वजांचे शनिवारी ग्रामपंचायतींकडून घरोघरी वितरण केले आहे. त्यामुळे रविवारी १३ रोजी) घरोघरी तिरंगा फडकणार असून १५ ऑगस्टपर्यंत राष्ट्रध्वज फडकत राहणार आहेत.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ कार्यक्रमांतर्गत केंद्रशासनाने गतवर्षापासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार गतवर्षी हर घर तिरंगा हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला होता. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात राष्ट्रभक्तीमय वातावरण पहावयास मिळाले होते. यंदा देखील घरोघरी तिरंगा फडकणार आहे. त्याबाबत केंद्रशासनाकडून निगर्मित झालेल्या सूचनांचे राज्यपातळीवरील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काटेकोरपणे पालन केले जात आहे.
राष्ट्रध्वज फडकविताना घ्यावयाची काळजी
देशाच्या अस्मितेचे प्रतिक असलेला राष्ट्रध्वज फडकविताना कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. ध्वज फडकवताना सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकवू नये. नागरिकांनी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १३ ऑगस्ट रोजी परासमोर फडकवत्तेला ध्वज १५ ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी उतरवणे आवश्यक आहे. दररोज १३ व १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी घरासमोरील ध्वज उतरवण्याची गरज नाही. शासकीय, निमशासकीय संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आदी संस्थांमध्ये मात्र ध्वजसंहितेनुसार दररोज सकाळी सुर्योदयानंतर ध्वज फडकवणे आणि सुर्यास्तापूर्वी ध्वज उतरवणे बंधनकारक आहे.
‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानाची यशस्वी अंमलबजावणी
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार देशासह राज्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविले जात आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तारावर ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये गावातील एक संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकाची उभारणी केली जात आहे. वसुधा वंदन म्हणून गावोगावी ७५ देशी रोपांची लागवड करून अमृत वाटीका तयार केली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील देशासाठी योगदान दिलेले, निवृत्त वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात दिवे लावून पंचप्राण शपथ घेतली आहे. तसेच गावक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय,शाळा आदी ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन केले आहे. त्यानंतर १६ ते २० ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हा
‘स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव’ या उपक्रमाचा ३० ऑगस्टपर्यंत सांगता समारंभ सुरु राहणार आहे. त्यानुसार ९ ते १४ ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर आणि १६ ते २० ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हा उपक्रम सुरु राहणार आहे. तसेच १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या तीन दिवसांमध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये दररोज ध्वजरोहण करायचे आहे. तसेच गतवर्षीच्या उपक्रमानंतर जतन करून ठेवलेले ध्वज ग्रामस्थांनी १३ ऑगस्ट रोजी आपल्या घरासमोर फडकवायचे आहेत. आणि १५ ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी ते उतरवायचे आहेत. हा उपक्रम राबविताना सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करायचे आहे.
-संतोष पाटील, प्रशासक तथा सीईओ जिल्हा परिषद कोल्हापूर