पुरातत्व विभागाकडे जबाबदारी : उच्च न्यायालयाच्या हस्पक्षेपानंतर मंजुरी
वृत्तसंस्था/ पुरी
ओडिशाच्या पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला 12 व्या शतकातील जगन्नाथ मंदिराच्या ‘नटमंडप’च्या दुरुस्तीचे काम करण्यास मंजुरी दिली आहे. तर मंदिर प्रशासनाकडून मंजुरी मिळण्यापूर्वी ओडिशा उच्च न्यायालयाने पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नटमंडपाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू करण्यास सांगितले होते.
या प्राचीन मंदिरांच्या काही स्तंभांमध्ये भेगा दिसून आल्याने पुरातत्व सर्वेक्षण विभागाला तत्काळ दुरुस्ती कार्य करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पुरातत्व अधिकारी, मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसोबत संबंधित घटकांची बैठक पार पडली. दुरुस्तीकार्याची प्रक्रिया गुरुवारीच सुरू झाली असली तरीही औपचारिक स्वरुपात दुरुस्ती कार्य शुक्रवारीच सुरू झाल्याचे मंदिर प्रशासनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी म्हटले आहे.
कार्तिक मासामुळे मंदिरातील गर्दी विचारात घेत काम करण्याचा कालावधी बदलावा लागेल. दुरुस्ती कार्य करताना पुरेशी खबरदारी घेतली जाईल, जेणेकरून देवीदेवतांशी निगडित विधींना कुठलाही अडथळा होऊ नये आणि भाविकांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे दास यांनी नमूद पेले आहे.
तांत्रिक पथक दुरुस्तीकार्यावर देखरेख ठेवणार आहे. तर मंदिराच्या निरीक्षकाला परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. पुरातत्व विभागाला नटमंडपाच्या दुरुस्तीसाठी 120 दिवसांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.