हुकुमशहाचा सैन्याला आदेश ः मुलीसोबत पाहिले क्षेपणास्त्र परीक्षण
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी स्वतःच्या सैन्याला खऱया युद्धासाठी सैन्याभ्यासाला वेग देण्याचा आदेश दिला आहे. किम यांनी यापूर्वीच स्वतःच्या सैन्याला युद्धाभ्यासाचा विस्तार करणे आणि युद्धसज्जता मजबूत करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर कोरियाने गुरुवारी 6 क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. या परीक्षणांदरम्यान किम जोंग हे स्वतःच्या मुलीसोबत दिसून आले.
सैन्याने युद्धाशी निगडित सर्व स्थितींकरता सज्ज रहावे. सैनिकांनी दोन सामरिक मोहिमांसाठी तयार रहावे. यात युद्ध रोखण्याची आणि युद्ध सुरू करण्याची मोहीम सामील असल्याचे किम यांनी म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र परीक्षण 13 मार्चपासुन सुरू होणाऱया अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्याभ्यासापूर्वी पार पडले आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्यसंबंधांना विरोध म्हणून उत्तर कोरियाने हे क्षेपणास्त्र परीक्षण केल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांचे परीक्षण करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.