वृत्तसंस्था / हांगझाऊ
जगातील सर्वांत मोठी बहुराष्ट्र क्रीडास्पर्धा असलेल्या आशियाई खेळांचे औपचारिक उद्घाटन शनिवारी सायंकाळी हांगझाऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर एका शानदार सोहळ्याने झाले. यावेळी मंत्रमुग्ध करणारा दृकश्राव्य कार्यक्रम हे एक खास वैशिष्ट्या राहिले. उद्घाटन समारंभाची सुऊवात एका कलात्मक कार्यक्रमाने झाली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या अतिमहनीय व्यक्तींमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील होते. जिनपिंग यांनीच आशियाई खेळ सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली.
खेळाडूंचे संचलन हे एक महत्त्वाचे आकर्षण राहून त्यात भारतीय पथकाचे ध्वजधारक बनून नेतृत्व पुऊष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यानी केले. भारतीय पथकात महिलांनी खाकी साडी आणि पुरूष खेळाडूंनी खाकी कुर्ता परिधान केला होता.
त्यापूर्वी कलात्मक कार्यक्रमात मोठ्या पडद्यावर चीनची ‘ग्रेट वॉल’ दाखवण्यात येऊन चीनचा ध्वज घेऊन चालणारे सैनिक व्यासपीठावर दाखल झाले. या सगळ्यांना पार्श्वभूमीला गाण्याची साथ होती. चीनचे राष्ट्रगीत सादर झाल्यानंतर आशियाई खेळांचे शुभंकर व्यासपीठावर त्यांच्यासोबत एक उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी रंगमंचावर सर्वत्र असलेले सुंदर दिवे आणि नृत्य लक्ष वेधून घेत होते.
या वातावरणात पथकांचे संचलन सुरू होऊन अफगाणिस्तान, त्यानंतर बहरीन, बांगलादेश, भूतान, कंबोडिया आणि उत्तर कोरिया, हाँगकाँग यांची पथके दाखल झाली. त्यांच्यापाठोपाठ भारतीय पथक आणि त्यानंतर इराण, इराक व अन्य पथके आली. संचलन झाल्यानंतर आशियाई खेळ आयोजन समितीचे अध्यक्ष गाओ झिदान यांचे भाषण झाले. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे अंतरिम अध्यक्ष रणधीर सिंग यावेळी बोलताना म्हणाले, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या वतीने मला सांगायचे आहे की, आम्ही किती अभिमानास्पद आणि आनंदी वाटत आहे. ‘हार्ट टू हार्ट अॅट फ्युचर हे केवळ आशियाई खेळांचे घोषवाक्य नाही, तर ते आशियाचे भविष्य देखील आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आशियाई खेळ आता अधिकृतपणे सुरू झाले असल्याचे नंतर घोषित केले. मग ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचा ध्वज फडकविण्यात येऊन मनमोहक संगीत आणि काही उत्कृष्ट प्रकाशयोजनांसह शानदार डान्स शो सादर करण्यात आला. यातून चीनचा सांस्कृतिक वारसा दाखविण्यात आला. स्टेडियमवर ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर अंतिम कार्यक्रम होऊन उद्घाटन समारंभाची सांगता झाली. ज्योत प्रज्वलित करताना देण्यात आलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची साथ लक्षवेधी ठरली.