नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू ताकद दाखविण्यास सज्ज, पदकसंख्या वाढविण्याचा निर्धार
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
कोविड-19 महामारीमुळे अभूतपूर्व एक वर्षाच्या विलंबानंतर आज शनिवारी औपचारिकपणे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार असून ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्रा याच्या नेतृत्वाखालील भारतीय पथक क्रीडाक्षेत्रातील एक शक्ती म्हणून आपली क्षमता दाखवण्याचा त्यात प्रयत्न करेल. भारताने इंडोनेशियामध्ये 2018 मध्ये 70 पदके (16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य) जिंकली होती. ही कामगिरी यावेळी मागे टाकली जाण्याची आशा आहे.
यावेळी भारताचे 655 खेळाडूंचे सर्वांत मोठे पथक हांगझाऊ येथे 39 खेळांमध्ये भाग घेणार असून टोकियो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर देशाने क्रीडा क्षेत्रात किती वेगाने प्रगती केली आहे ते दाखविण्याचा यावेळी प्रयत्न केला जाईल. 2018 मधील आशियाई खेळांमध्ये भारताला आठव्या स्थानावर राहावे लागले होते. नजीकच्या भविष्यात ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या देशासाठी हे समाधानकारक नसून हांगझाऊमधील पदकतालिकेत ते अधिक वरचे स्थान पटकावण्याचा प्रयत्न करतील. कोविड महामारी आल्यानंतरची सर्वांत मोठी बहुक्रीडा स्पर्धा आशियाई खेळांच्या माध्यमातून चीनमधील हांगझाऊ येथे रंगू लागली आहे.
सेऊलमधील 1986 च्या आशियाई खेळांपासून भारत पदकतालिकेतील अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. ’इस बार, सौ पार’ ही यावेळी कॅचलाइन आहे. जरी 100 पदके शक्य नसली, तरी भारत मागील स्पर्धेतील पदकांची संख्या ओलांडण्याची अपेक्षा असून यात पुन्हा एकदा सिंहाचा वाटा अॅथलेटिक्सला उचलावा लागेल. गेल्या वेळी ट्रॅक आणि फिल्डच्या खेळाडूंनी 20 पदके जिंकली होती आणि यावेळी किमान 25 पदके त्यांच्याकडून मिळविली जाण्याची अपेक्षा आहे.
आशियाई खेळांच्या इतिहासात प्रथमच भारतीय पथकात पाच ऑलिम्पिक पदक विजेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व करत आहे भालाफेकीतील सुपरस्टार चोप्रा. ते आपले विजेतेपद राखून ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे 2018 मध्ये जिंकलेल्या 16 सुवर्णांपेक्षा देशाला अधिक सुवर्णपदके मिळण्याची आशा वाढवली आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हे इतर ऑलिम्पिक पदकविजेते आहेत.
तरीही भारताला किती सुवर्णपदके मिळू शकतील हे सांगणे कठीण आहे. सिंधू काही काळापासून संघर्ष करत आहे, चानूला अलीकडेच तंदुरुस्तीच्या समस्यांना तोंड द्यावे लागलेले आहे, तर बजरंगने कुस्तीपटूंच्या निषेधात भाग घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच सराव व प्रशिक्षण सुरू केले होते. बोरगोहेन आणि चोप्रा मात्र अलीकडेच जगज्जेते झाले आहेत. आज शनिवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगसह बोरगोहेनही जबाबदारी सांभाळेल.
2018 मधील अॅथलेटिक्समधील आठ सुवर्ण पदकांच्या कमाईची पुनरावृत्ती करणे कठीण असले, तरी हॉकी (पुऊष आणि महिला), कबड्डी (पुरूष आणि महिला), बुद्धिबळ आणि तिरंदाजी यांच्या माध्यमातून भारत सुवर्णपदकांमध्ये वाढ करू शकतो. सध्याचा फॉर्म पाहता भारत पुरूष आणि महिला हॉकी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतो. भारत पुरूष आणि महिलांच्या कबड्डीमध्येही सुवर्ण जिंकू शकतो आणि जकार्तामध्ये गमावलेल्या संधीची भरपाई करू शकतो. गेल्या वेळी पुरूष संघाला कांस्य आणि महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
नेमबाजांनी 2018 मध्ये दोन सुवर्णपदकांसह नऊ पदके दिली होती, परंतु यावेळी ते सदर संख्या ओलांडू शकतील अशे म्हणणे धाडसाचे ठरेल. बॉक्सिंगमध्ये निखत झरिन आणि बोरगोहेन यांच्याकडून पदक जिंकले जाण्याची अपेक्षा आहे. परंतु हे पदक कुठल्या प्रकारचे असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. 2018 मध्ये दोन सुवर्णांसह तीन पदके जिंकणाऱ्या कुस्तीपटूंचीही अशीच स्थिती आहे.
जगातील सर्वांत मोठ्या बहुक्रीडा स्पर्धेचे आयोजन करून चीन महामारीतून मुक्तीनंतरच्या प्रवासाची एक प्रकारे सुरूवात करत आहे. ही महाकाय स्पर्धा आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वांत मोठी आहे. ऑलिम्पिक हे जगातील बहुक्रीडा स्पर्धांचे शिखर आहे यात शंका नाही, परंतु आशियाई खेळांमध्ये अधिक खेळाडू भाग घेत असतात. 12,000 हून अधिक खेळाडूंनी हांगझाऊमध्ये भाग घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुमारे 11,000 खेळाडू सहभागी झाले होते आणि पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होतील. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये 11,000 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता, ज्याला चीनने मागे टाकले आहे.
19 वे आशियाई खेळ 8 ऑक्टोबरपर्यंत हांगझाऊ आणि पाच सहयजमान शहरे हुझो, निंगबो, शाओक्सिंग, जिन्हुआ आणि वेन्झो येथे चालतील. आशियाई खेळ खरे तर सप्टेंबर, 2022 मध्ये होणार होते. परंतु चीनमध्ये कोविड-19 प्रकरणे वाढल्याने ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. आशियातील 45 राष्ट्रे आणि प्रदेश 40 खेळांतील 481 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा करतील. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रोइंग, सेलिंग आणि आधुनिक पेंटॅथलॉनमधील स्पर्धा भव्य उद्घाटन सोहळ्यापूर्वी सुरू झाल्या आहेत