महिलेचे कपडे, चप्पल पुलावर. महिला काजीवाडा विठ्ठलापूर कारापूर येथील. पाण्यात शोध सुरू.
डिचोली : आमोणा ते खांडोळा या पुलावर एका वृध्द महिलेने मांडवी नदीच्या पाण्यात उडी मारल्याचा संशय असल्याने या महिलेचा पाण्यात शोध सुरू करण्यात आला आहे. सदर महिलेच्या कपड्यांची पिशवी पुलाच्या रेलिंगला बांधलेल्या अवस्थेत आहे तर तेथेच तिचे चप्पलही आहे. त्या महिलेला त्यांच्याच वाड्यावरील एकाने पुलवर उभी असलेली पाहिली होती. त्यामुळे तिने मांडवीत उडी घेतल्याचाच कयास बांधण्यात आला आहे. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी भर पावसात होडीच्या आधारे मांडवी नदीच्या पाण्यात सझर महिलेचा संध्याकाळी काळोख पडेपर्यंत शोध घेतला. परंतु त्या सापडू शकल्या नाही.
उपलब्ध माहितीनुसार काजीवाडा विठ्ठलापूर कारापूर साखळी येथील गीताबाई अपय्या भोसले (वय 60) असे सदर महिलेचे नाव आहे. काल गुरू. दि. 21 सप्टें. रोजी दुपारी सदर महिला आमोणा पुलावर हातात कपड्यांची पिशली घेऊन उभी होती. त्याचवेळी या पुलावरून एका त्यांच्या शेजाऱ्याने तिला जाताना पाहिले होते. त्याने आपल्या घराकडे फोनद्वारे या महिलेची चौकशी केली असता, सदर महिला आपल्या घरात नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याच दरम्यान सदर महिलेने या पुलाच्या रेलिंगला आपल्या हातातील कपड्याचे गोठडे बांधले व चप्पल येथेच काढून त्यांनी थेट पाण्यात उडी मारली. नंतर पुलावर त्या महिलेला पहायला गेल्यास ती दृष्टीस पडलीच नाही. या घटनेची माहिती नंतर पोलिसांना व डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आली. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर डिचोली अग्निशामक दलाचे जवान दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले. त्यांनी पाण्यात होड्यांच्या सहाय्याने भर पावसात शोधाशोध केली परंतु काहीच हाती लागले नाही. आज शुक्रवारी (22 सप्टें.) सकाळपासून पुन्हा शोध सुरू केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.