रॉयटर्सच्या अर्थतज्ञांच्या सर्वेक्षणातून माहिती
नवी दिल्ली :
भारतीय अर्थव्यवस्था जूनच्या तिमाहीत गेल्या एका वर्षातील सर्वात वेगाने वाढू शकते असे रॉयटर्सने अर्थतज्ञांसोबत केलेल्या सर्वेक्षणातून सांगितले आहे. अर्थतज्ञांच्या सर्वेक्षणानूसार एप्रिल ते जून दरम्यान अर्थव्यवस्था 7.7 टक्के दराने वाढू शकते. सर्व्हेक्षणानूसार, सेवा क्षेत्रातील वाढ, मजबूत मागणी आणि सरकारचा वाढता खर्च यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मदत होत आहे.
51 अर्थतज्ञांचे मत
या सर्वेक्षणात 51 अर्थतज्ञांची मते घेण्यात आली होती, त्यापैकी 49 जणांचा असा विश्वास होता की जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मार्च तिमाहीपेक्षा जास्त असेल. मार्च तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.1 टक्के दराने वाढली.
तज्ञांचे मत काय आहे
अहवालात, इक्राच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की पहिल्या तिमाहीत, आर्थिक क्रियाकलापांवर सेवा क्षेत्रातील वाढीव मागणी आणि गुंतवणूक क्रियाकलापांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्याचवेळी, या तिमाहीत भांडवली खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 1750 अब्ज वरून 2785 अब्ज रुपयांपर्यंत वाढला आहे.