आनंदनगर येथील घटनेने संताप, पाणीपुरवठा कंपनीचा कारभार चव्हाट्यावर
बेळगाव : चोवीस तास पिण्याच्या पाण्याची योजना आनंदनगर, वडगाव येथे सुरू नाही. केवळ पाईप घालण्यात आले आहेत. असे असताना या परिसरातील अनेकांना मोठ्या रकमेची बिले देण्यात आली आहेत. आनंदनगर येथील प्रा. एस. ए. पाटील यांना चक्क 24 तास योजनेतील पाण्याचा वापर केला म्हणून तब्बल 12 हजार 94 रुपये बिल देण्यात आले असून यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे पाणीपुरवठा कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे यामध्ये जुलै 2021 चा उल्लेख करण्यात आला आहे. या वॉटर सप्लाय प्रोजेक्ट कंपनीच्या बिलामुळे मोठा धक्का बसला आहे. आनंदनगर परिसरात 24 तास पाणीपुरवठा योजना अजून सुरूच करण्यात आली नाही. असे असताना अशा प्रकारे बिल देण्यात आल्यामुळे नेमका हा प्रकार काय चालला आहे, हे समजणे अवघड झाले आहे. योजना अंमलात नाही बिल मात्र त्या नावाने दिले जाते. ही खरोखरच दुर्दैवी बाब असल्याचे बोलले जात आहे.
आनंदनगर, वडगाव परिसरात पूर्वीपासूनचे जे नळ आहेत त्या नळांनाच पाणी येत नाही. असे असताना 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे, असे दाखविण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वास्तविक, अजूनपर्यंत ही योजनाच राबविली नाही. मात्र अशा प्रकारे आताच बिले येत असतील तर 24 तास नळ जोडणी करून घ्यायची की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आनंदनगर परिसराकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. रस्ते, गटारी यांच्या समस्या आहेत. पाण्याची तसेच ड्रेनेजची समस्याही गंभीर बनत चालली आहे. असे असताना अचानक अशा प्रकारे पाण्याची बिले दिली जात आहेत. यामुळे नेमका प्रकार काय आहे? अशी चर्चा सध्या सुरू आहे. जुलै 2021 मधील हे बिल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुद्दल 6 हजार 125 तर त्याचे व्याज 1 हजार 575 असे एकूण 7 हजार 700 त्यानंतर जुलै नंतरचे थकीत बिल म्हणून 3 हजार 850, व्याज 369 व इतर 175 असे एकूण 4 हजार 394 अशी रक्कम या बिलामध्ये नोंद करण्यात आली आहे. दोन्ही रकमा मिळून 12 हजार 94 थकीत बिल असल्याचे नमूद करत हे बिल त्यांना देण्यात आले आहे. अशा प्रकारे अनेकांना बिले दिली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.