दिल्लीत तीन आयएसआयएस हस्तकांनाअटक, शस्त्रे हस्तगत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुणे पोलीस आणि एनआयए यांच्या संयुक्त कारवाईत दिल्ली परिसरातून शहानवाझ ऊर्फ शफी उज्जामा या कुप्रसिद्ध दहशतवाद्यासह एकंदर तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनेक शस्त्रेही हस्तगत करण्यात आल्याचे वृत्त आहे. शहानवाझ आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा हस्तक असून त्याला पकडून देणाऱ्यास 3 लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. एनआयएने या दहशतवाद्याच्या ठाण्यातील घरावरही धाड घातल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहानवाझ उज्जामा याच्या दोन साहाय्यकांनाही एनआयएने पकडले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात विविध स्थानी बाँबस्फोट घडवून हत्या करण्याचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे कारस्थान त्यांनी रचले होते. हे कारस्थान प्रत्यक्षात आणण्यासाठी तो जागा हेरत होता. गुप्तचरांनी वेळीच माहिती पुरविल्याने हा कट उधळण्यात एनआयएला यश आले आहे.
दिल्लीचे पुणे कनेक्शन
देशात अनेक स्थानी आयएसआयएसची मोड्युल्स असल्याचा संशय आहे. त्यांपैकी दिल्ली आणि पुणे येथींल मोड्युल्सचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या दोन्ही स्थानी शहानवाझ उज्जामा हा दुवा म्हणून काम करीत होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. बाँबस्फोट आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी जागा निवडण्याचे काम त्याच्यावर सोपविले होते. या कामावर त्याची नियुक्ती विदेशातील सूत्रधारांकडून करण्यात आल्याचा संशय आहे.
सणांच्या काळात हल्ल्यांची योजना
गणेशोत्सवानंतर आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. नवरात्र, दसरा आणि नंतर दिवाळी या कालावधीत देशभरात स्फोट घडवून आणण्याचे कारस्थान आयएसआयएसने रचले होते. त्याची पूर्वतयारी उज्जामा करीत होता. बाँब पेरण्यासाठी त्याने काही जागा हेरुन ठेवल्या होत्या. त्याचे साहाय्यक मोहम्मद अर्शद वारसी आणि मोहम्मद रिझवान यांच्यासह तो भारतात अनेक ठिकाणी प्रवास करुन ‘रेकी’ करत होता, असे स्पष्ट झाल्याची माहिती देण्यात आली.
सात दिवसांची कोठडी
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उज्जामा आणि त्याच्या दोन साहाय्यकांना न्यायालयासमोर सोमवारीच उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यांच्या चौकशीतून दहशतवाद्यांच्या अनेक कटकारस्थानांचा पर्दाफाश होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.