दैनंदिन सार्वजनिक प्रवास त्रासदायक : नवीन बस खरेदीचा प्रस्ताव रखडला
बेळगाव : शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनसमोर बस कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन सार्वजनिक प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. विशेषत: बसमध्ये महिलांची गर्दी होत असल्याने धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे समस्येत पुन्हा भर पडली आहे. मागील चार वर्षात परिवहनने नवीन बसेस खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे जुन्या बसवरच परिवहनचा गाडा सुरू आहे. परिणामी नादुरुस्त होणाऱ्या बसेसची संख्या वाढू लागली आहे. कोरोनादरम्यान अनेक गावची बससेवा अद्याप बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.
बेळगाव आणि चिकोडी विभागात दैनंदिन 1080 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. त्यापैकी 250 हून अधिक बसेस बेंगळूर, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, या आंतरराज्य प्रवासासाठी धावतात. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत सरासरी 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी शहर आणि ग्रामीण भागात बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून असल्याने आंतरराज्य प्रवासासाठी अधिक बसेस धावतात. मात्र परिवहनकडे बसेसची कमतरता असल्याने आंतरराज्य प्रवासावरदेखील परिणाम होऊ लागला आहे. परिवहनच्या ताफ्यात बस चालक, बस वाहक आणि बसची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे उत्पन्नापासून दूर रहावे लागत आहे.
नवीन बस दाखल झाल्यानंतर समस्या मार्गी
बेळगाव विभागात बसेसची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर 50 इलेक्ट्रिक बसेस आणि नवीन 100 बसेसचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच नवीन बस दाखल झाल्यानंतर प्रवाशांची समस्या मार्गी लागणार आहे.
गणेश राठोड (विभागीय नियंत्रक बेळगाव)