सांस्कृतिक प्रतिनिधी/ पणजी
’सुरईश’ संस्थेच्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त सुरईश, भारत विकास परिषद गोवा प्रांत आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा(आयएमबी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयएमबीच्या सभागृहात शनिवारी झालेल्या ‘हृदयी प्रीत जागते’ या भावसंगीताच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
कलर्स मराठीवरील ’सुर नवा ध्यास नवा’ चा महागायक उत्कर्ष वानखडे व उपविजेती संज्योति जगदाळे यांनी व त्यांच्या सोबत गोव्याची अक्षता रामनाथकर यांनी विविधांगी गीते पेश करून रसिकांना मनमुराद आनंद दिला. प्रसिद्ध अभिनेत्री तथा निवेदिका अनुश्री फडणीस देशपांडे यांच्या शैलीदार निवेदनाने व गोमंतकीय नामवंत वादक नितीन कोरगावकर(तबला), बाळकृष्ण मेस्त(सिंथे सायझर), शिवानंद दाभोलकर(संवादिनी), अश्विन जाधव(ऑक्टोपॅड) व तारानाथ होळेगद्दे(तालवाद्य) यांच्या रंगतदार साथीने कार्यक्रमाची लज्जत वाढली.
यावेळी सुरईशचे अध्यक्ष प्रमोद धुंगट, कार्यकारी सदस्य संजीव शिरवईकर व सुयश कळंगुटकर यांनी संस्थेचे हितचिंतक विनायकुमार मंत्रवादी, अॅŸड सुदिन उसगावकर, विजय पै, डॉ गुऊदास नाटेकर, मंगेश गावकर तसेच भारत विकास परिषद गोवा प्रांतचे अध्यक्ष किरण वेर्णेकर व आयएमबीचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर यांचा आणि कलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. अनुश्री फडणीस देशपांडे यांनी मैफलीचे सुरेखपणे निवेदन केले. कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.