मुले शाळेत जायला लागली की मुलांच्या आहाराचा प्रश्न पालकांपुढे आ वासून उभा राहतो. हा प्रश्न सोडवताना पालक कशाचाही विचार करत नाहीत. चार-पाच वर्षाच्या बालकाच्या डब्यामध्ये सरळसरळ कोरडे अन्न दिले जाते. लहान मुलांना रस्सा भाजी आवडते परंतु ती डब्यात देण्याचे प्रमाण फार कमी असते. शिवाय डब्यात अन्नाचे प्रमाण हे खूप असते. अशा अनेक बाबींचा उहापोह या लेखात.
एका रेस्टॉरंटमधील दृश्य- समोरच्या टेबलावर एक वर्षाच्या एका बालकाला बसवले होते. टेबलजवळच्या खुर्च्यांवर त्या बालकाची आई, आजी आणि वडील बसले होते. बालक अत्यंत खेळकर मूडमध्ये होते. आई-आज्जी त्याचे कौतुक करत होत्या. वडिलांनी दिलेली जेवणाची ऑर्डर टेबलवर मांडली जात होती. त्या बालकाने उत्सुकतेने मसाला पापडाकडे बघितले आणि त्यावर हात मारून ते हातात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आई आणि आजी या दोघीना साक्षात्कार झाला की बालकाला भूक लागली आहे. त्यांनी पिशवीतला डबा काढला आणि त्यातला वरण भात त्याला देण्याचा प्रयत्न केला. बालकाने अर्थातच ठाम नकार दिला आणि पापडाकडे बोट दाखवले. थोड्याच वेळेत बालकाचे जेवण हा दोघींच्या दृष्टीने ‘इज्जत का सवाल’ झाला. बालकाच्या आईने बालकाचे दोन्ही हात मागून धरून ठेवले. आजीने घास भरवण्यास सुरुवात केली पण बालक ऐकेना. मोठी माणसे काहीतरी चटपटीत खात आहेत आणि आपल्याला गुळमुळीत वरण भात भरवला जातो आहे, हे त्याला सहन होईना. ते बालक रडू लागले, मोठी माणसे खात असलेले जिन्नस मागत राहिले. दोन्ही बाजू इरेला पेटल्यामुळे आई-आजी यांनी बळाचा वापर करून वरण-भाताचे घास त्या बालकाला भरवला. शेवटी आई-आजी या दोघींचा विजय झाला पण बालक अन्याय झाल्याच्या भावनेत हमसा-हमशीने रडत होते.
प्रसंग दुसरा. एका रेस्टॉरंटमध्ये आई-वडील तीन वर्षाच्या बालकासह एका टेबलाजवळ बसले. त्यांनी ऑर्डर दिलेले जिन्नस आल्यानंतर बालकाच्या आईने आपल्या हातातला मोबाईल त्या बालकाला दिला. त्यावर ते बालक कार्टून बघू लागले. एका मिनिटात ते बालक मोबाईलमध्ये गुंतले आणि आईने तत्परतेने एकेक घास भरवण्यास सुरुवात केली. बालकाने त्या मोबाईलसाठी काहीही खाण्याची तयारी दाखवल्यामुळे आई खुश झाली. व्यवहारामध्ये तडजोड कशी करावी याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता बालकाला ‘व्यवहार’ समजू लागला. आपल्या बाळाने आपल्या मनासारखे खावे आणि गुटगुटीत व्हावे ही पालकांची इच्छा असते. एकदा पालकांच्या मनासारखे खाल्ल्यानंतर आता दोन तास काहीही कर, असे सांगितले गेल्यामुळे ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ची कला बालकांना रांगत्या वयात उमगते. माणूस लहान असो वा मोठा, भूक लागल्यावर हात-पाय हलवतो, खाण्याचे डबे शोधतो, भूक असेल तेव्हा मिळेल ते अन्न त्या मानवाला ‘गोड’ लागते. परंतु पालक बालकांना भूक लागण्याची वेळच आणू देत नाहीत. बालके बालवाडीमध्ये जाण्यास सुरुवात करताच याचे स्वरूप अजून भीषण होते.
आपला बालक शाळेत जाणार या कल्पनेने पालक फारच खुश असतात. बालकाचे शिक्षण सुरु होणार यापेक्षा ते बालक आता किमान चार तास तरी घरामध्ये असणार नाही याचाच पालकाना विलक्षण आनंद असतो. शाळेत गेल्यावर आता त्याला वळण लागेल हे सुद्धा पालकांचे स्वप्न असते. बालवाडी सकाळी 10.30 वाजता सुरु होणार असेल तर बालकाला सकाळी झोपेमधून उठल्यावर लगेच एक मोठा कप भरून दुध दिले जाते. त्यामध्ये साखर घातली जाते आणि उंची वाढण्यासाठी, बुद्धी तल्लख होण्यासाठी बाजारात जे काही मिळते ते सर्व त्या दुधात ओतले जाते. बालकाने ते दुध पटकन गिळंकृत करावे यासाठी त्याला चॉकलेट फ्लेवर दिला जातो. मोठा कप भरून दिलेले दुध बालकाने संपवल्यावर बालकाच्या आईला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आता बालक खेळायला जाणार तेवढ्यात त्याला सांगितले जाते की तासाभरात जेवायला बसायचे आहे. अर्थातच तासाभराने त्या बालकाला भूक लागलेली नसते परंतु त्याला अन्न आग्रहाने भरवले जाते. त्यानंतर शाळेच्या सुट्टीत त्याला काही कमी पडू नये म्हणून डबा दिला जातो. त्या डब्यात असते काय?
चार-पाच वर्षाच्या बालकाच्या डब्यामध्ये कोरडे अन्न दिले जाते. बटाट्याची परतून केलेली भाजी आणि चपाती ही पालकांची आवड. लहान मुलांना रस्सा भाजी आवडते परंतु ती डब्यात देण्याचे प्रमाण फार कमी आहे. कांदे पोह्यासारखे पदार्थ गरम असताना खाल्ले तरच खाल्ले जातात परंतु त्याचा विचार पालक सहसा करत नाहीत. दुसरा प्रश्न म्हणजे डब्यात दिल्या जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण खूप असते आणि डब्यातील सर्व काही खाऊन रिकामा डबा घरी आणावा अशी पालकांची अपेक्षा असते. यावर मुले भन्नाट उपाय शोधून काढतात. आपल्याला न आवडणारी भाजी दुसऱ्याला देणे, दुसऱ्याच्या डब्यातील आवडीचे पदार्थ खाणे, शाळेतून येताना हळूच शिल्लक डबा टाकून देणे. असे उपाय कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता मुले शिकतात.
यावर अनेक उपाय आहेत. प्रथमत: लंच बॉक्स विकत घेताना मुलांना बरोबर घेऊन जावे. पालकांनी भाजी मंडईमध्ये मुला-मुलीना घेऊन जावे आणि त्यांच्या आवडीच्या भाज्या/कडधान्य घ्यावे.
आज डब्यामध्ये कोणती भाजी आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी आणि मुलांना डबा भरणे शिकवल्यास त्या डब्याबद्दल मुलांना आपलेपणा वाटतो. डब्यामध्ये भाजी अधिक देणे अपेक्षित असते परंतु पोळी/भाकरी अधिक दिली जाते. पौष्टिक आहार आठवड्यातून किमान दोन वेळा असावा, बिस्कीटे, चिप्स, हा कोरडा खाऊ नव्हे. घरी तयार केलेला चिवडा, भडंग याला कोरडा खाऊ म्हणता येईल. असे जिन्नस लहान मुलांची मदत घेऊन त्यांच्या समक्ष घरी तयार करावेत. एवढे करूनही “आज केलेली भाकरी आणि पालेभाजी मी खाणार नाही” असे मुला-मुलीने जाहीर केल्यास उपाशी राहण्याची मुभा पालकांनी कोणतीही आदळ-आपट न करता द्यावी. खाण्यावर जितके लक्ष दिले जाते तितके लक्ष पाणी पिण्यावर दिले जात नाही असेही आढळून येते. जेवणाची शिस्त मुलांना घरामध्ये लावल्यानंतर शाळेत पाठवण्यास सुरुवात करावी. एकूणच जेवण, हात धुणे, स्वत:ची व्यक्तिगत स्वच्छता याचे शिक्षण पालकांनी मुलांना घरीच द्यावे. शाळेत गेल्यावर तो सगळे आपोआप शिकेल अशी अपेक्षा ठेवू नये. काही शाळांमध्ये आठवड्याचे मेनू ठरवून दिलेले असतात. उदा. सोमवारी पालेभाजी, मंगळवारी उसळ, बुधवारी फळभाजी असे काहीसे मेनू ठरवून दिल्यामुळे डबा हा प्रकारच आवडेनासा होतो. काही शाळात रोज पोळी-भाजी आणणे बंधनकारक आहे. असे नियम केल्यामुळे अन्नावरची वासना उडून जाणार, यात शंका नाही. काही शाळेत आपल्या डब्यातले जिन्नस एकमेकात ‘शेअर’ करण्यास बंदी आहे. त्यामुळे विपरीत संस्कार होतात.
सात वर्षाच्या आनंदला नावडते पदार्थ कोणते असे विचारल्यावर तो म्हणाला, “मला वांग्याची भाजी आवडत नाही. पण ज्या दिवशी माझ्या ताटातल्या वाटीत भाजीवर बरीच कोथिंबीर खोबरे टाकलेले असते, तेव्हा मी ओळखतो की त्याखाली वांगे असेल”. पालकांचे हे ‘राजकारण’ सात वर्षे वयाच्या मुलांना सहज समजत असते. ऑफिसला जाणारे वडील कोणती भाजी असेल तर डबा घरी विसरतात, किंवा त्याच दिवशी ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे डबा तसाच परत आला, हे सर्व मुले बघत असतात. “अर्धा तास अभ्यास केलास तर तुला कुरकुरे घेऊन देईन” असे ‘व्यवहार’ मुलांशी कधीही करू नयेत. रोज चहा-कॉफी पिणारे आई-वडील आपल्याला मात्र दुध देतात, याचा विलक्षण राग मुलांच्या मनात असतो. खरे तर रोज दुध पिण्यामुळे बुद्धी तल्लख होत नसते. फक्त दुध पिणे आणि वरण भात खाणे हा चौरस आहार नव्हे. रोज चहा पिणे ‘अपायकारक’ नसते, चहामुळे जेवण रद्द होऊ नये एवढाच उद्देश असावा. चॉकलेट खाण्यामुळे दात किडतात असे सांगण्यापेक्षा चॉकलेट खाल्यावर चूळ भरणे, दात घासणे बंधनकारक केल्यास मुलांकडून सकारात्मक अधिक प्रतिसाद येतो. आपण जे काही खातो ते पदार्थ कसे तयार केले जातात याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवावे. अन्नाचा दर्जा आणि किती प्रमाणात खायचे यावर बालक आणि पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. चौरस आहारापेक्षा कमी आहार असावा. परंतु पालकांना आपली मुले गुटगुटीत होण्याची घाई झाल्याचे दिसते. एकवेळ मुल उपाशी राहिले तरी चालेल पण त्याने चुकीचा आहार घेऊ नये असा पालकांचा आग्रह असावा. एकूणच ‘खादीची चळवळ’ करण्यापेक्षा मोजके पण दर्जेदार अन्न खाण्याचा आग्रह पालकांनी धरल्यास सदृढ बालकांपेक्षा निरोगी बालक घरात वावरेल.
सुहास किर्लोस्कर