प्रधान वनरक्षक राजीवकुमार गुप्ता यांचे दीक्षांत समारंभात आवाहन : 18 वनरक्षक सरकारच्या सेवेत दाखल
वाळपई : वनखात्यामध्ये कार्यरत असताना प्रत्येकाने पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानला पाहिजे. सरकारी नोकरी न समजता पर्यावरण व निसर्गाचे रक्षण याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा आदर्श घेऊन नवीन कर्मचाऱ्यांनी वन संरक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पेलावी, असे आवाहन गोवा राज्य वनखात्याचे प्रधान वनरक्षक राजीव कुमार गुप्ता यांनी केले आहे. वनखात्यात 18 वनरक्षक सेवेत दाखल झाले असून त्यांच्या सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यात आल्यानंतर दीक्षांत समारंभ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वाळपई येथील गोवा राज्य वन संशोधन व प्रशिक्षण केंद्रत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य वनसंरक्षक प्रवीण राघव, गोवा राज्य वन संशोधन व प्रशिक्षण केंद्र संचालक तथा उपवनसंरक्षक तेजस्विनी पुसुलरी, साहाय्यक उपवनसंरक्षक श्री. चोडणकर, गोवा राज्य वन संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य विश्वनाथ पिंगुळकर व इतरांची खास उपस्थिती होती. आज निसर्गासमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणींवर मात करून प्रत्येकाने वनाचे निसर्गाचे व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. केवळ सरकारी नोकरी न मानता समाजाच्या सेवेप्रति आपण कटिबद्ध आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी व आगामी काळात आपली जबाबदारी समर्थपणे पेलावी, असेही आवाहन राजीव कुमार गुप्ता यांनी यावेळी केले. सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यकाल पूर्ण करण्यात आल्यानंतर आता 18 वनरक्षक सरकारच्या सेवेत दाखल झालेले आहेत. यामुळे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून खात्याची प्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावे, अशीही सूचना यावेळी गुप्ता यांनी केली.
आज जंगल संपत्तीशी संघर्ष निर्माण झालेले आहेत. जंगल नष्ट झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जैवविविधतेवर होऊ शकतात. त्याचप्रमाणे बफर झोनलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी व आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक प्रवीण राघव यांनी यावेळी केले. प्रशिक्षणाच्या कारकर्दीत शिकविण्यात आलेले अनेक मुद्दे यांनी स्पष्ट करताना नवीन कर्मचाऱ्यांनी याचे कडकपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता आपले कार्य हे प्रभावी व पारदर्शक व्हावे, यासाठी प्रत्येकाने योगदान देणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. सुऊवातीला केंद्राच्या संचालिका व उपवनसंरक्षक तेजस्विनी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात वनरक्षकांना केलेल्या मार्गदर्शनाची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना उत्कृष्टपणे प्रशिक्षण देऊन योगदान दिलेल्या प्रशिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत आयकर, सोमनाथ बेतोडकर, कृपाश फडते, राम गावकर, शिवनाथ गावकर, मनोहर गावडे, प्रियांका गावडे, लक्ष्मण गवस, महादेव गावस, शांताराम गावस, मिलन मडकईकर, तृप्ती माटणेकर, जयंती मिसाळ, राहुल मचेमाडकर, चंदू नाईक, गोविंद नाईक विश्वास नाईक अविनाश परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुऊवातीला मान्यवरांनी परेडची पाहणी केली. कार्यक्रमाच्या नंतर केंद्राच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनौषधी झाडांची लागवड करण्यात आली. प्रभारी प्राचार्य विश्वनाथ पिंगुळकर यांनी आभार मानले.