कृषीमंत्री रवी नाईक यांचे प्रतिपादन : मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करुन दिले धन्यवाद
फोंडा : राज्यात फोंडा हा तिसरा जिल्हा व्हावा ही आपली मागणी मान्य करुन सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खास अभिनंदन करतो. त्यांचा हा निर्णय योग्य तसेच अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे गोवा मुक्तीपूर्व व गोवा मुक्तींतर, असे दोन्ही काळ अनुभवलेले फोंड्याचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले. मंत्री नाईक हे मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात असून पाचवेळा फोंडयातून निवडून आलेले आहेत. मागील कित्येक वर्षापासून फोंडा हा राज्यातील तिसरा जिल्हा व्हावा, अशी मागणी लावून धरणारे ते पहिले नेते आहेत.
‘सरकार तुमच्या दारी’ची पूर्ती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली खास समिती नेमून तिसरा जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला चालना दिल्याने आपले स्वप्न पूर्ण होण्याकडे सरकारने वाटचाल सुरू केली आहे. फोंडा हा तिसरा जिल्हा झाल्यानंतर अनेक प्रशासकीय सुधारणा होणार असून अनेक साधनसुविधा उभ्या राहणार आहेत. भाजपा सरकारच्या ‘सरकार तुमच्या दारी’ची खऱ्या अर्थाने वचनपूर्ती होणार आहे, असेही नाईक म्हणाले.
फोंड्यासह अन्य भागांचाही विकास
फोंड्यासह शेजारील तालुक्यांच्याही सर्वांगिण विकासासाठी मदत होईल. या जिल्ह्याचे मुख्यालय साकारण्यासाठी कुर्टी येथील कृषी पणन केंद्राची भरपूर जागा उपलब्ध आहे. राज्याच्या मध्यावर्ती असलेला फोंडा व आसपासच्या तालुक्यांना प्रशासकीय कामासाठी पणजी किंवा मडगांव गाठावे लागणार नाही. जनतेला वेळ, पैसा यांचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, असेही ते म्हणाले.