प्रतिनिधी /फोंडा
केरये खांडेपार सरकारी प्राथमिक शाळेच्या छप्पराकडील तीन वासे जीर्ण व जर्जर झाल्याने छप्पर धोकादायक स्थितीत आहे. या शाळेत इयत्ता पहिले ते चौथीपर्यंत 27 विद्यार्थी शिकत असून तिसरीच्या वर्गाकडील एका बाजूचे वासे निकामी झाले आहेत. भागशिक्षणाधिकाऱयांनी त्याकडे त्वरित लक्ष घालून छप्पर दुरुस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
वास्तविक मे महिन्याच्या सुट्टीत हे छप्पर दुरुस्त करण्याची आवश्यकता होती. त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. आता पावसाळा जवळ आल्याने व शाळा सुरु झाल्याने दुरुस्तीकाम गैरसोयिचे होणार आहे. तरीही मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने छप्पराची तातडीने पाहणी करुन आवश्यक पावले उचण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे. फोंडा-बेळगाव महामार्गाच्या बाजूलाच केरये-खांडेपार येथे ही शाळा असून शाळेच्या आवरात मुलांना खेळण्यासाठी असलेले लोखंडी झोपाळे व घसरगुंडी गंजली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांची नजर चुकवून मुले तेथे खेळायला गेल्यास गंभीर दुखापत होण्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे. गंजलेले हे साहित्य बदलण्याची मागणीही केली जात आहे. शिवाय शाळेचे कुंपणे काही ठिकाणी खचल्याने त्याच्या दुरुस्तीकामाकडेही लक्ष घालावे, असे पालकांनी सांगितले.