डॉ. चेतनकुमार मेहता यांचे प्रतिपादन : दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनतर्फे बेळगाव ज्वेलरी रिटेलर्स मीट 2022 कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
सोन्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. बऱयाचवेळा सुवर्णकार प्रिमियम जास्त असल्याने इन्शुरन्स काढण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जेव्हा चोरी अथवा आग लागून मोठी घटना घडते, त्यावेळी प्रिमियमपेक्षा कितीतरी मोठय़ा पटीने नुकसान होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक सुवर्णकाराने इन्शुरन्स करावा. आज सुवर्णकारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असून, हा व्यवसाय कसा वाढेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन बेंगळूर येथील लक्ष्मी डायमंड्सचे चेअरमन डॉ. चेतनकुमार मेहता यांनी केले.
दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन बेळगाव यांच्या वतीने सोमवारी शहापूर येथील दैवज्ञ ब्राह्मण मंगल कार्यालयात बेळगाव ज्वेलरी रिटेलर्स मीट 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठावर हुपरी येथील सीए कृष्णा बोरचाटे-पाटील, संघटनेचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर, एकनाथ पाऊसकर, सेपेटरी माणिक अणवेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर म्हणाले, बेळगावमध्ये सर्व ज्वेलरी असोसिएशन एकत्रित येऊन काम करत आहे. बेळगावमध्ये अनेक कार्पोरेट ज्वेलर्स येत असून त्यांचे ब्रॅंडिंग सुरू आहे. यामुळे लहान व्यावसायिकांनाही आता आपण उत्तम प्रकारचे सोने देतो हे ग्राहकांना पटवून द्यावे लागणार आहे. त्यामुळे गुणवत्तेवर काम करणेही तितकेच गरजेचे आहे. बीआयएस हॉलमार्क हा ज्वेलर्ससाठी आशिर्वाद असून यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करता येणार आहे. सोने खरेदी करताना वजनात फरक येत असल्याने तपासणी करूनच सोने खरेदी करा, असे आवाहन त्यांनी सुवर्णकारांना केले.
बेळगावमध्ये भरविणार भव्य ज्वेलरी प्रदर्शन
काही वर्षांपूर्वी बेळगाव ही एक सोन्याची पेठ म्हणून ओळखली जात होती. येथे तयार केलेले कलाकुसरीचे दागिने देशभर पाठविले जात होते. परंतु मागील काही वर्षात ही ओळख पुसली गेली आहे. त्यामुळे बेळगावला पुन्हा जुने दिवस येण्यासाठी द ज्वेलर्स असोसिएशन बेंगळूरच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य प्रदर्शन लवकरच भरविले जाणार असून, त्यामध्ये स्थानिक कारागिरांना संधी दिली जाणार असल्याचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर यांनी सांगितले.