सलग तिसऱया दिवशी घसरण ः जागतिक पातळीवर नरमाईचा कल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात मोठी घसरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये मागील सलग तीन दिवसांपासून सेन्सेक्स व निफ्टी यांचा प्रवास प्रभावीत राहिला आहे. यामध्ये अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र सेन्सेक्स दिवसअखेर तब्बल 1,000 पेक्षा अधिक अंकांनी कोसळला आहे. जागतिक पातळीवरील प्रमुख घडामोडींमध्ये जगभरातील शेअर बाजारात नरमाईचा कल राहिल्याचा प्रभाव हा भारतीय बाजारावरही दिसून आला.
गुरुवारी फेडरल बँकेच्या निर्णयादिवशीच शेअर बाजारात मोठी घसरण होणार अशी स्थिती सकाळच्या सत्रात बनली होती. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1,020.80 अंकांनी म्हणजे 1.73 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 58,098.92 वर बंद झाला आहे. यामध्ये काहीवेळ सेन्सेक्स 1,137.77 अंकांपर्यंत कोसळला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 302.45 अंकांनी प्रभावीत निर्देशांक 17,327.35 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिडकॉर्पचे समभाग सर्वाधिक 7.93 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारतीय स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचडीएफसी आणि इंडसइंड बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे फक्त सनफार्मा, टाटा स्टील आणि आयटीसीचे समभाग लाभासह बंद झाले आहे.
आशियातील बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिले आहेत. युरोपीयन शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीचा कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.87 टक्क्यांनी घसरुन 88.77 डॉलर बॅरेलवर राहिले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून निव्वळ 2,509.55 कोटी रुपयांच्या मूल्यांच्या समभागांची विक्री झाली आहे.