केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. गांधी कुटुंबाने छत्तीसगडमध्ये गरीब परिवारांना सट्टेबाजी आणि दारूचे व्यसन लावत उद्ध्वस्त केले आणि स्वत:चा खजिना भरला असल्याचा आरोप इराणी यांनी केला आहे. भगवान महादेवाचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करू नका. तसेच गंगाजलाची शपथ घेत खोटी आश्वासने देणाऱ्या आणि भगवान रामाच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या पक्षाला धडा शिकवा, असे आवाहन इराणी यांनी जनतेला केला आहे.
एखाद्या राज्यातील पुण्यभूमीत सत्ता मिळवून मुख्यमंत्री पद भूषविणारा नेता सट्टेबाजांचा साथीदार होण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आहे. पापाच्या पैशातून तिजोरी भरणारे भूपेश बघेल हे 508 कोटी रुपये दिल्याचे सांगतात. हे पैसे कोणाला देण्यात आले हे जनता ओळखून असल्याचे म्हणत इराणी यांनी अप्रत्यक्षपणे गांधी परिवाराला लक्ष्य केले आहे.
बघेल यांच्या सट्टेबाजीच्या खेळामुळे कुठल्याही काँग्रेस नेत्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले नाही. गरीब आणि निष्पाप परिवारांच्या सदस्यांनाच यात सर्वस्व गमवावे लागले आहे. गांधी परिवाराने गरीबांना उद्ध्वस्त करत स्वत:ची तिजोरी भरल्याचा आरोप इराणी यांनी केला आहे. आम्ही ‘बम बम भोले’चा जप करतो आणि काँग्रेस महादेवाच्या नावावर सट्टेबाजीचा अॅप चालवितात आणि गरीबांना लुटतात. काँग्रेस आणि भाजपच्या संस्कृतीत हाच फरक आहे. मोदींनी काशी विश्वनाथ आणि महाकाल कॉरिडॉर निर्माण करविले तर काँग्रेसने महादेवाचा अपमान केला आणि त्याच्या नावावर सट्टेबाजीचा धंदा केल्याची टीका इराणी यांनी केली आहे.
या गांधी परिवाराने न्यायालयासमोर भगवान रामाचे अस्तित्व नसल्याचे सांगितले होते, त्याच परिवाराचा पुत्र आणि कन्या (राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा) आता रामभक्तांकडून मत मागण्यासाठी मंदिरांना भेट देत आहेत असा शाब्दिक प्रहार इराणी यांनी केला आहे.