म. ए. युवा समितीची वारकऱ्यांमध्ये जागृती
प्रतिनिधी/ बेळगाव
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. यंदाच्या या वारीमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावर्षी तरी सीमाप्रश्न सुटू दे आणि बेळगाव महाराष्ट्रात सामील होऊ दे, अशी मागणी या वारीदरम्यान विठुरायाकडे करण्यात येत आहे.
युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथून वारीमध्ये सहभाग घेतला. तेथे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत जागृती करण्यात आली. वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविषयी माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्यासाठी सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्रित येण्याची मागणी करण्यात आली.
टाळ-मृदंगाच्या गजरात चाललेल्या या वारीमध्ये सीमाप्रश्नाचाही जागर करण्यात आला. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम, संतोष कृष्णाचे, आनंद पाटील यासह बेळगावमधील वारकरी सहभागी झाले होते.