प्रतिनिधी/ पणजी
अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सभापतींना सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांवरून गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनीही काँग्रेसच्या आठ बंडखोर आमदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर येत्या 29 सप्टेंबर रोजी निर्णय घेणार आहेत.
18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षात गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या मतभेदामुळे त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सभापतींना एका आठवड्याच्या आत कालमर्यादा निश्चित करण्यास सांगितल्याने गोव्यातही काँग्रेसच्या आठ बंडखोर आमदारांविऊद्धची याचिकेवर निर्णय लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
‘तरुण भारत’शी बोलताना सभापती तवडकर म्हणाले, आठ बंडखोर काँग्रेस आमदारांविऊद्ध अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी करत आहोत. या बंडखोर आमदारांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश केला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मलाही निर्णय करण्यासाठी सुनावणी घ्यावी लागणार आहे. यापूर्वीच 29 सप्टेंबर रोजी दोन सुनावणी निश्चित केली असल्याचेही ते म्हणाले.
29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सभापती तवडकर हे गतवर्षी जुलैमध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याबद्दल तत्कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो, संकल्प आमोणकर आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात राज्य काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता, ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या आठ बंडखोर काँग्रेस आमदारांविऊद्ध डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करतील.