विविध प्रकारच्या अनेक रोजगारसंधी : स्थानिक कुशल मनुष्यबळाची गरज
पणजी : गोवा राज्य आता लॉस्टिस्टिक हब होत चाललेय असून त्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सीआयआयने ते तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पणजीत काल शुक्रवारी झालेल्या लॉजिस्टिक परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
लॉस्टिस्टिक हबची क्षमता
ते पुढे म्हणाले की गोवा हे लहान राज्य असले तरी इंटरनेट जोडणी इतर राज्यांपेक्षा गोव्यात चांगली आहे. देशातील व जगातील नामवंत असे लॉस्टिस्टिक हब होण्याची क्षमता गोवा राज्यात असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
कुशल मनुष्यबळाची गरज
दोन विमानतळ, रेल्वे, बंदर, राष्ट्रीय महामार्ग अशा सर्व साधनसुविधा आता गोव्यात उपलब्ध असल्यामुळे आता कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) कृती करावी अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली. गोव्यातील लॉजिस्टिक क्षेत्रात भवितव्य घडवण्याची संधी प्राप्त झाली असून राज्यातील तरूण पिढीने त्यासाठी पुढे यावे. या क्षेत्रात उद्योगव्यवसायही करता येणार आहे. तसेच नोकरीच्या संधीही मिळतील असे ते म्हणाले.
गोव्यातून आता निर्यात शक्य
पंतप्रधान गती-शक्ती व इतर केंद्रातील, राज्यातील योजनांच्या आधाराने गोव्यात पायाभूत सोयी-सुविधा उभारणी सुरू आहे. दूध, भाजीपाला, मासळी व इतर माल, साहित्य यांची निर्यात करणे गोवा राज्याला आता शक्य असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. लॉजिस्टिक हबमुळे अनेक अद्योग व्यवसाय यांना प्रोत्साहन मिळणार असून देशाच्या तसेच राज्याच्या दरडोई उत्पान्नात मोठी वाढ होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. विकसित भारतासोबत विकसित गोव्याचे स्वप्नही साकार होणार आहे. असेही ते म्हणाले. या लॉजिस्टिक परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे झाली असून एकंदरीत अहवाल, शिफारशी सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.