सेन्सेक्स 897 अंकांनी घसरला, आयटी कंपन्यांचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमधील दबाव आणि ऑटो, बँकिंग समभागांमध्ये विक्रीवर दिला गेलेला जोर यामुळे सुरुवातीच्या सत्रात तेजीसह सुरू झालेला शेअरबाजार सरतेशेवटी घसरणीसह बंद झाला.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 897 अंकांच्या घसरणीसह 58,237 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 258 अंकांनी घसरत 17,154 अंकांवर बंद झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारच्या सत्रामध्ये पायाभूत सुविधा, आयटी, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये दबाव दिसून आला. धातू, औषध, ऊर्जा, बँकिंग, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये घसरण पहायला मिळाली. सुरुवातीला शेअरबाजार तेजीसह कार्यरत होता. मात्र, नंतर बाजारामध्ये घसरणीला सुरुवात झाली.
शेअरबाजारात इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स यांचे समभाग घसरणीत राहिले होते. तर टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, ओएनजीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले. निफ्टी बँकेचा निर्देशांक 920 अंकांनी सोमवारी घसरला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. फक्त टेक महिंद्राचा समभाग मात्र 6 टक्के वाढीसह तेजी राखून होता. अदानी ग्रुपच्या 10 समभागांपैकी 4 समभागांमध्ये तेजी राहिली होती. याच दरम्यान, सोमवारी ग्लोबल सर्फेसेस यांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी बाजारात खुला झाला होता. दुसरीकडे येस बँकेच्या समभागाने घसरण सोमवारी अनुभवली. भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेवर तीन वर्षासाठी समभाग विकण्यासाठी बंदी घातली होती. जिचा कालावधी सोमवारी संपुष्टात आला. विदेशातील बाजारामध्ये अमेरिकेतील बाजार आणि युरोपातील बाजार चांगलेच घसरणीत राहिले होते.