सलग तीन सत्रातील तेजी थांबली, भारती एअरटेल नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
तीन सलग तेजीच्या सत्राला सोमवारी भारतीय शेअर बाजाराने विराम दिल्याचे दिसून आले. जागतिक नकारात्मक वातावरणामुळे अल्पशा घसरणीसह दोन्ही निर्देशांक बंद झाले असून यात भारती एअरटेल व टीसीएस यांचे समभाग सर्वाधिक घसरल्याचे दिसले.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 86 अंकांच्या नुकसानीसह 54,395.23 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 4 अंकांच्या घसरणीसह 16,216 अंकांवर बंद झाला.
आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या दबावामुळे सेन्सेक्स निर्देशांक सोमवारी काहीसा नकारात्मक वातावरणात व्यवहार करताना दिसला. सकाळी दोन्ही निर्देशांक घसरणीसह खुले झाले होते. जागतिक स्तरावरील नकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दुपारपर्यंतच्या सत्रात पाहायला मिळाला. एकावेळी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांच्या घसरणीसह 54,198 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 60 अंकांच्या घसरणीसह 16150 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील भारती एअरटेलच्या समभागाचे भाव मोठय़ा प्रमाणात आपटलेले दिसले. यांच्या सोबत आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे समभागही जवळपास 4 टक्के इतके नुकसानीत होते. विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत होते. पण एनटीपीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग मात्र तेजी दर्शवत होते.
आयटी निर्देशांक नुकसानीत
सोमवारी बाजारात सर्वाधिक पडझड झाली ती आयटी निर्देशांकाची. निफ्टी आयटी निर्देशांक सोमवारी जवळपास 3.10 टक्के इतका घसरलेला होता. मीडिया व फार्मा निर्देशांक काहीशा घसरणीसह व्यवहार करत होते. इतर क्षेत्रांच्या निर्देशांकाचा मात्र बाजाराला आधार लाभला.