जागतिक अस्थिर स्थितीचे सावट, टीसीएस समभाग 2 टक्के नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक अस्थिर स्थिती, विदेशी गुंतवणुकीत आलेली घट व कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअर बाजार मात्र दबावात घसरणीसह बंद झाला. सुरूवातीच्या जबर घसरणीनंतर आयटी व निवडक ऑटो, बँकिंग समभागांनी आधार दिल्याने बाजार सावरला. यातही टीसीएसचा समभाग 2 टक्के वधारला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह 57,991.11 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 73अंकांनी घसरुन 17241 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या सत्रात एकावेळी सेन्सेक्स निर्देशांक 800 अंकांनी घसरून 57365 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह 17100 अंकांपर्यंत खाली आला होता. सर्व क्षेत्रातल्या निर्देशांकाची नकारात्मक वाटचाल होती. निफ्टीतील बँक निर्देशांक, ऑटो निर्देशांक व एफएमसीजी क्षेत्राचे निर्देशांक 1 टक्के इतके घसरलेले पहायला मिळाले. फक्त आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सीचे समभाग मात्र नफ्यात होते. या आठवडय़ात आयटी कंपन्यांचे तिमाही नफा-तोटय़ाचे अहवाल सादर होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागामध्ये या आठवडय़ात चढउतार अपेक्षित धरला जात आहे. टाटा मोटर्सचे समभाग बाजारात 4 टक्के इतके घसरले होते. रुपया मात्र अजूनही घसरणच नोंदवत असून नवी नीचांकी पातळी गाठतो आहे. सोमवारी सुरुवातीच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 38 पैसे कमकुवत होत 82.68 वर आला होता. कच्चे तेल दरात वाढ, अमेरिकेतील फेडरल बँकेकडून दरवाढीची चिंता तसेच वाढती व्यापारी तूट या साऱयाचा परिणाम भारतीय रुपयावर होत आहे. शेअर बाजारात टाटा मोटर्ससह, हिरो मोटोकॉर्प, ग्रेसीम, एचडीएफसी व अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग घसरणीत होते. तर पॉवरग्रीडचे समभाग मात्र तेजीत होते. सेन्सेक्सची सकाळी सुरुवातच 700 अंकांच्या पडझडीसह झाली. निफ्टीही 220 अंकांनी नुकसानीत होता.