जगात अनेक धर्मांमध्ये मृत्यूनंतर पार्थिवाला जमिनीत थडगं तयार करून दफन केले जाते. या कारणामुळे जगात अनेक देशांमध्ये दफनभूमी आढळून येतात. या दफनभूमीतील थडग्यांकडे जात लोक स्वत:च्या आप्तांना फुलं वाहून त्यांचे स्मरण करत असतात. परंतु जगात एक अशी दफनभूमी आहे, जेथे 5 हजारांहून अधिक थडगी आहेत, परंतु एकही मृतदेह नाही.
स्पेनच्या बर्गोस शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर दक्षिण-पूर्व दिशेला एक दफनभूमी असून याचे नाव सॅड हिल सिमेटरी आहे. सँटो डोमिंगो डी सिलॉस नावाच्या वस्तीपासून ही दफनभूमी सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पहिल्यांदा येणाऱ्या लोकांना अखेर ही दफनभूमी नागरी वस्तीपासून इतकी दूर का आहे असा प्रश्न उद्भवतो. या 5 हजारांहून अधिक थडग्यांमध्ये एकही मृतदेह नाही. प्रत्यक्षात ही खरीखुरी दफनभूमी नाही. एका चित्रपटाच्या सेटच्या स्वरुपात 1960 च्या दशकात याला तयार करण्यात आले होते. 1966 मध्ये प्रदर्शित ‘द गुड, द बॅड अँड द अगली’ हा एक इटालियन वेस्टर्न चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्जियो लियोन या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले होते. या चित्रपटात क्लिंट ईस्टवुड हा प्रसिद्ध अभिनेता होता. या चित्रपटाच्या क्लायमॅसच्या दृश्यासाठी ही दफनभूमी तयार करण्यात आली होती.
300 मीटर व्यासात सुमारे 5 हजार थडग्यांचे दगड लावण्यात आले आहेत. या दफनभूमीची निर्मिती शेकडो स्पॅनिश जवानांनी केली होती. अत्यंत उष्ण दिवसांमध्ये निर्मिती कंपनीने सैनिकांना एका दिवसासाठी प्रत्येकी 132 रुपये दिले होते. तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 478 रुपयांपर्यंत रक्कम दिली होती. चित्रिकरण संपल्यावर प्रत्येक जण तेथून परतला आणि दफनभूमी अशाचप्रकारे राहिली. काही वर्षांमध्ये तेथे झुडुपं उगवली आणि पूर्ण भाग भीतीदायक वाटू लागला. 2015 मध्ये काही लोकांनी मिळून सॅड हिल कल्चरल असोसिएशनची स्थापान केली होती. याच्या अंतर्गत या भागाची साफसफाई करत याला पर्यटनस्थळात रुपांतरित करण्यात आले. येथे आता कुणीही 1300 रुपये देऊन थडग्याच्या दगडावर स्वत:चे नाव कोरून घेऊ शकतो.