रविवार रात्री उशिरापर्यंत अलोट गर्दी : विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावे
बेळगाव : हलते देखावे हे बेळगावच्या गणेशोत्सवाचे एक आकर्षण असते. यावर्षीही समाजप्रबोधन करणारे अनेक देखावे मंडळांनी सादर केले आहेत. एसपीएम रोड, गांधीनगर यासह इतर भागात सुबक गणेशमूर्ती पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी गर्दी होत आहे. संध्याकाळी 7 नंतर गर्दीने रस्ते फुलत असून रविवारी विकेंड असल्यामुळे गर्दीने उच्चांक गाठला होता. आसपासच्या मोठ्या शहरांच्या मानाने बेळगावमध्ये मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा होतो. भव्यदिव्य व सुबक गणेशमूर्ती बेळगावमध्ये घडविल्या जातात. गणेशमूर्ती पाहण्यासाठी चंदगड, खानापूर, संकेश्वर, हुबळी येथील नागरिक बेळगावमध्ये दाखल होतात. मागील दोन दिवसांपासून देखावे तसेच गणेशमूर्ती पाहण्यासाठी शहरात प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
आकर्षक देखावे
यावर्षी खडक गल्ली गणेशोत्सव मंडळाने अमृतमहोत्सवानिमित्त राजवाडा साकारला आहे. याचबरोबर ताशिलदार गल्ली येथील मंडळानेही राजमहल उभारून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. एसपीएम रोड येथील मंडळाने हलत्या देखाव्यातून सर्कस साकारली आहे. शनिवार खुट येथील मंडळाने फिरती गणेशमूर्ती साकारल्याने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. याचबरोबर गांधीनगर येथे कुस्ती मैदान व छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार हे देखावे लक्ष वेधून घेत आहेत. शुक्रवार पेठ-टिळकवाडी येथील सुबक गणेशमूर्ती व पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथील कारंजा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली. अनगोळ येथे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. जयकिसान भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यावर्षी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
विक्रेत्यांना संधी
गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सायंकाळी 7 नंतर गणेशमूर्ती व देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत बेळगावच्या मुख्य रस्त्यांवर गणेशभक्तांची वर्दळ दिसून येत आहे. लहान विक्रेत्यांना ही एक संधी मिळाली असून वडापाव, पाणीपुरी यासह चटपटीत पदार्थ, चहा, पाण्याच्या बाटल्या यांची विक्री रात्री उशिरापर्यंत करण्यात येत आहे.