वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीची 2023 सालातील पुरुषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात येत्या वर्षअखेरीस भरवली जाणार आहे. या स्पर्धेत स्थान मिळवण्याकरिता विविध देशांमध्ये चुरस चालू आहे. दरम्यान विश्वचषक पात्र फेरीची क्रिकेट स्पर्धा झिंबाब्वेत 18 जून ते 9 जुलै दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी विविध संघ आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पात्र फेरीच्या स्पर्धेतून दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत दाखल होतील.
पात्र फेरीच्या स्पर्धेमध्ये अ गटात यजमान झिंबाब्वे, विंडीज, नेदरलँड्स, नेपाळ आणि अमेरिका तर ब गटामध्ये श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. प्राथमिक साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील संघाबरोबर सामने खेळणार आहे. या दोन गटातील आघाडीचे तीन संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर सिक्स फेरीनंतर अधिक गुण मिळवणारे पहिल्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या पात्रता फेरीच्या स्पर्धेत एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. 9 जुलै रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना होईल. तर स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान झिंबाब्वे आणि नेपाळ यांच्यात 18 जुनला हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे.