वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथे देवदर्शन करून घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे अंदाजे एक लाख रुपये किमतीचे घंटन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धूम स्टाईलने हिसडा मारून लांबवले या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवार दि. ३ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कोडोली येथील अंबाबाई मंदिर ते चव्हाटा या मार्गावर कोळ्याची चिंच येथे ही घटना घडली.याबाबत घटनास्थळावरून व कोडोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील चावडी भागात राहणाऱ्या दोन महिला अंबाबाई देवदर्शनासाठी तसेच नातेवाईक रूग्णालयात असल्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रूग्णालयात गेल्या होत्या. रूणांची चौकशी करून व देवदर्शन घेऊन घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वाराने महिलेच्या गळ्यात असलेल्या सोन्याचे घंटण हिसडा मारून घेऊन सुसाट वेगाने पसार झाला. गळ्यातील दागिना तोडला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी तो धरण्याचा प्रयत्न केला परंतु काही क्षणातच चोरटा दागिना घेऊन पसार होण्यास यशस्वी ठरला.हा चोरटा हिरव्या रंगाच्या मोटारसायकलवरून आला असून तो काखे गावच्या दिशेने गेला असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादित नमूद आहे. पुढील तपास सपोनि शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली हिदूराव केसरे व त्याचे सहकारी करत आहेत .