सशस्त्र हल्ल्यात उमेश हरिजन जागीच ठार : सुरे, कोयत्याच्या सपासप वारांनी भोसकले,पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज
प्रतिनिधी /वास्को
वास्को काटे बायणात रस्त्यावर अडवून आणि सुरा व कोयत्याचे वार करून युवकाचा खून करण्याची घटना सोमवारी दिवसाढवळय़ा घडली. खून झालेल्या युवकाचे नाव उमेश हरिजन (33) असे असून तो याच भागातील राहणारा आहे. त्याचा खून करणाऱयांमध्ये चार ते पाच युवकांचा समावेश आहे. संशयित युवक खून करून हत्त्यारे तिथेच टाकून पसार झाले आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयितांपैकी दोघेजण जुने गोवे येथे फोंडा पोलिसांच्या तावडीत सापडले. या खुनाने पुन्हा एकदा संपूर्ण गोव्याला हादरवून सोडले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेशकुमार यांच्यासह मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत, वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक व वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ताबडतोब चौकशीला प्रारंभ केला.
पूर्ववैमनस्यातून झाला असावा खून
खून केल्यानंतर संशयित आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी गोव्यात सर्वत्र तपासणीचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून का झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातूनच हा खून झालेला असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांच्यामध्ये खटके उडाले होते, एवढेच नव्हे, तर हल्ल्याचेही प्रयत्न झाले होते. मुरगावचे पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाची ही घटना काल सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बायणा किनाऱयासमोरील चौपदरी महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली बर्फाच्या फॅक्टरीजवळ घडली.
सशस्त्र जोरदार हल्ल्याने जागीच मृत्यू
मयत उमेश हा युवक किनाऱयावरील वस्तीत पुजल्या जाणाऱया सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या मित्रासोबत गेला होता. त्या ठिकाणी या युवकाने जेवण घेतले. तो व त्याचा मित्र परत जाण्यासाठी निघाले होते. परंतु तेथून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना युवकांच्या एका गटाने अडवले. प्रथम उमेश याच्यावर लाथ हाणली आणि नंतर त्याच्या पाठीवर सुरी हल्ला केला. त्यानंतर मानेवर, हाता पायांवर व शरीरावर अन्य ठिकाणी वार करून त्याला जागीच संपवले. या हल्ल्यामुळे उमेशचा मित्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजुला झाला. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या या युवकाकडे पाहून तिथे जमा झालेल्या लोकांमध्ये थरकाप उडाला. हल्लेखोर अधिक वेळ न दवडता तेथून पसार झाले. जाताना त्यांनी एक सुरा व कोयता त्याच ठिकाणी टाकून दिला होता.
बाणस्तारीपासून जुने गोवेपर्यंत पाठलाग करुन पकडले दोघांना
उमेश हरिजन याच्या खुनातील संशयित आरोपींना गजाआड करण्यासाठी गोव्यात सर्वत्र आदेश देण्यात आले होते. पाळत ठेवण्यात आली होती. त्यामुळे संध्याकाळी दोघेजण जुने गोवे येथे फोंडा पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना गजाआड करण्यासाठी फोंडा पोलिसांना बाणस्तारी ते जुने गोवेपर्यंत त्यांचा पाठलाग करावा लागला. अटक करण्यात आलेल्यांची नावे दीपक सहानी व अमीर अशी आहेत. फोंडा पोलिसांनी त्यांना मुरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुरगाव पोलिसांनी घटनास्थळी सापडलेली हत्त्यारे जप्त केली आहेत. मुरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यापूर्वी मयताच्या भावावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
मयत उमेश हरिजन आणि त्याचा खून करणारे युवक काटे बायणा भागातीलच आहेत. उमेश हा बायणातच एक बार चालवत होता. त्याचा खून करणाऱयांमध्ये चार ते पाच युवकांचा समावेश असल्याचे बोलले जात असले तरी मयताच्या मित्राने सहा ते सातजण हल्ला करण्यासाठी तयारीनीशी आले होते असे म्हटले आहे. या मित्रानेच उमेशच्या भावाला फोन करून घटनास्थळी बोलावले. कारमधून आलेल्या उमेशच्या भावाने व मित्राने उमेश याला त्याच कारमध्ये घालून चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मयताचा भाऊ इक्बाल याने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी अशाच प्रकारच्या हल्ल्याचा प्रयत्न त्याच्यावरही झाला होता. तो व त्याचा मित्र आपले वाहन सोडून पळाल्याने वाचले होते. या प्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या, असे मयताच्या भावाने म्हटले आहे.