सर्व उड्डाणे दोन तास ठप्प
काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर यंत्रणेमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास समस्या निर्माण झाली. यानंतर सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. जवळपास दोन तास ही यंत्रणा बंद राहिल्याने येथील विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. तसेच शेकडो प्रवाशांना बराचवेळ तिष्ठत रहावे लागले. या यंत्रणा बिघाडामागील दोष काय आणि कसा झाला याबाबत विमानतळ अधिकाऱयांनी उशिरापर्यंत कोणतीही माहिती दिली नव्हती.
यापूर्वी 11 जानेवारीला अमेरिकेतही विमानसेवा ठप्प झाली होती. येथे विमान वाहतूक प्रणालीतील त्रुटीमुळे 4,663 उड्डाणांना विलंब झाला होता. तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. 4 तासांनंतर विमानसेवा हळूहळू सामान्य झाली. या प्रकरणी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावली आणि परिवहन सचिवांकडून अहवालही मागवला होता. चौकशीअंती विमान वाहतुकीशी संबंधित यंत्रणेतील काही महत्त्वाच्या नोंदी आणि फाईल्स डिलिट केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी अद्याप अंतिम तपास अहवाल जारी करण्यात आलेला नाही.
पंधरवडय़ापूर्वी नेपाळमध्ये दुर्घटना
यापूर्वी 15 जानेवारी रोजी नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या विमान अपघातात विमानाने याच विमानतळावरून उड्डाण घेतले होते. काठमांडूपासून 205 किमी अंतरावर पोखरामध्ये यति एअरलाईन्सचे विमान कोसळले. हे एटीआर-72 विमान होते, त्यात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या अवघ्या 10 सेकंदापूर्वी विमान एका टेकडीवर कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते.