गुहागर मार्गावर नव्या डांबरीकरणातील मोरीचा भाग २ महिन्यांतच खचला
प्रतिनिधी/चिपळूण
चिपळूण-गुहागर मार्गावर मिरजोळी-साखरवाडी येथे 2 महिन्यांपूर्वी करण्यात आलेली मोरी खचली आहे. त्यावरून पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुकवारी दुपारी 2.30 वा. घडली. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे सध्या अपघातांना निमंत्रण देत आहेत. असे असताना गुरूवारी ठेकेदाराने केवळ
एकाच खड्ड्यात खडी टाकून दिखावूपणा केला. मात्र जोरदार पाऊस पडताच ही खडी वर आली आहे. अन्य खड्डे तसेच असून गटाराचा प्रश्नही जैसे थे आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येथे फिरकतही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.