पंधरा वर्षांनंतर इमारतीचे मंत्रालय: नामकरण : प्रवेशद्वारातच होणार श्रीगणेशाचे दर्शन
पणजी : अखेर पर्वरीत ‘मंत्रालय’ तयार झाले आहे. आज गोवा घटकराज्य दिनी सकाळी 10 वा. वैदिक मंत्रोपचाराने व तत्पूर्वी सकाळी 7 वा. पासून उदकशांती आणि वास्तूशांतीद्वारे इमारत प्रकल्पाचे शुद्धीकरण आणि पावित्र्य निर्माण केले जाणार आहे. सुमारे 10 कोटी रुपये खर्चून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भव्य कार्यालय प्रकल्पाच्या तिसऱ्या मजल्यावर साकारण्यात आले आहे. इमारतीचा चेहरामोहराच बदलून गेलेला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र लिफ्ट उभारण्यात आली आहे. प्रवेशद्वारातच श्री गणेशाचे दर्शन तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात 10 फूट उंचीची भगवान श्रीकृष्णाची विराटरुप दर्शन मूर्ती उभी ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसनामागे ‘सत्यमेव जयते’ हे ब्रिदवाक्य लावण्यात आले आहे. पर्वरीत सचिवालय आणि विधानसभा प्रकल्प स्थापन होऊन 15 वर्षे लोटली आहेत. मात्र अनेकदा विनंती करूनदेखील मंत्री ज्या ठिकाणी बसतात त्याला मंत्रालय न म्हणता सचिवालयाची जोड इमारत असे म्हटले जायचे. प्रत्येक राज्याच्या राजधानीत जिथे मंत्रिमंडळ बसते, त्या ठिकाणाला ‘मंत्रालय’ असे म्हटले जाते आणि जिथे मंत्रालय असते त्या भागाला राजधानी मानले जाते. पर्वरी येथे मंत्रालय असून देखील त्याचे मंत्रालय असे नामकरण करण्यात आले नव्हते. उलटपक्षी तो सचिवालयाचा जोड भाग असे म्हटले जायचे.
‘मंत्रालय’ असे नामकरण
मुख्यमंत्र्यांचे दालन हे छोटे होते. थोडे अडचणीचे असल्याने सचिवालयाच्या बाजूच्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जो भाग रिक्त ठेवला होता त्या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांसाठी भव्य असे केवळ केबिनच नव्हे तर स्वतंत्र दालनच साकारण्यात आले आहे. या दालनाच्या निमित्ताने संपूर्ण इमारत प्रकल्पाच्या रचनेतही थोडाफार बदल करण्यात आला आहे. इमारतीचे ‘मंत्रालय’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मंत्रालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वत: करणार आहेत.
भव्य दिव्य गणेशमूर्ती
मंत्रालयाच्या उद्घाटन समारंभाला सर्व मंत्री व आमदारांना सकाळी 10 वा. बोलाविण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी 7 वा. वेदमूर्ती प्रकाश भावे व इतर ब्रम्हवृंदांतर्फे उदकशांती आणि वास्तुशांती होणार आहे. मंत्रालयात जाण्यासाठी जो नवा मार्ग तयार केला आहे तिथे गणपतीची भव्य दिव्य मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीसमोर आज सकाळी गणपती अथर्वशिष्य सादर केले जाणार आहे.
श्रीकृष्णविराट रुप दर्शन
मुख्यमंत्र्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वतंत्र विभागात श्रीकृष्णाचे विराट रुप दर्शन होईल, अशी लाकडी कोरीव मूर्ती बसविण्यात आली आहे. त्या ठिकाणी चिन्मय आमशेकर यांच्या नेतृत्वाखाली शृंगेरी शंकराचार्य स्वामींकडे परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या काणकोण येथील विद्यार्थी विद्यार्थींनीतर्फे भगवद्गीतेचा 11 वा अध्याय सादर करण्यात येणार आहे.
सत्यमेव जयते !
मुख्यमंत्र्यांच्या दालनातील मुख्यमंत्री ज्या ठिकाणी आसनस्थ होऊन या राज्याचा कारभार हाकणार आहेत ते त्यांचे कार्यालय हे अतिशय सुंदर पद्धतीने साकारले असून मुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे भिंतीवर ‘सत्यमेव जयते’ ही अक्षरे बसविण्यात आली आहेत. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण विभागात तथा दालनात कला व संस्कृती खात्याकडे असलेली काही महत्त्वाची पेंटिंग्स लावण्यात आली आहेत.
मंत्रालय : ! प्रथमच संस्कृतमध्ये फलक
मुख्यमंत्री ज्या इमारतीत इतर मंत्र्यांसमवेत बसणार आहेत, त्याच या इमारतीचे आज मंत्रालय असे नामकरण होत आहे. या प्रकल्पात गोव्याच्या ‘कावी’ कलेने भिंतीवर काही डिझाईन्स काढण्यात आले आहेत. प्रथमच गोवा मंत्रालयाच्या या सरकारी इमारतीचा नामफलक संस्कृतमधून लावण्यात आला आहे. मंत्रालय: अशी अक्षरे फलकावर लावण्यात आलेली आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शहनाई वादकांनाही पाचारण केले असून मंगलमय अशा वातावरणात मंगलधून वाजवून मंत्रालयाचे शानदार उद्घाटन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनाचे काम गोव्यातील वास्तुरचनाकार राजेश केंकरे यांनी केले आहे, तर प्रत्यक्ष बांधकाम मुंबईच्या स्ट्रक्चरल सोसायटी इंडिया लि. या कंत्राटदार कंपनीने केले आहे. गेले वर्षभर या प्रकल्पासाठीचे बांधकाम चालू होते.