जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या पुढाकारातून पर्यटनस्थळांची पुस्तिका
बेळगाव : जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे असून त्यांची माहिती नसल्यामुळे पर्यटनस्थळांना भेट देणे पर्यटकांना अशक्य झाले होते. नागरिकांचा पर्यटनाकडे वाढता कल लक्षात घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पुढाकार घेऊन पर्यटनस्थळांची माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती मिळण्यास सोयीचे ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, पर्यटनस्थळे आहेत. त्यांची योग्य माहिती नसल्यामुळे पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष झाले आहे. मोजकीच पर्यटनस्थळे वगळता बहुतांश पर्यटनस्थळे नागरिकांपासून दुरावली आहेत. याची दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पर्यटनस्थळांना महत्त्व देऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती संग्रहित करून तेथील छायाचित्रांसहीत माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पुस्तिका टुरिझम विभागाकडे सोपविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून नागरिक येत असतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती मिळावी, यासाठी कार्यालयातील भिंतींवर पर्यटनस्थळांची छायाचित्रे माहितीसहित प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या प्रकारे पर्यटनाला चालना देण्याबरोबर नागरिकांना माहिती मिळण्यास सोयीचे ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.