प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात विशेषत: आगोंद, लोलये, चिपळे भागांत इतके दिवस बिबट्यांनी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडण्याच्या घटना चालूच असताना चावडीवर भर बाजारात असलेल्या अजित पै यांच्या क्लासिक फर्निचरच्या दुकानात एकाच वेळी चार रानडुक्कर घुसून दुकानात हैदोस घालण्याची घटना 25 रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली.
चावडीवरील जुन्या बसस्थानकाच्या दिशेने आलेल्या या कळपाने रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या दोन दुचाकी पालथ्या घातल्या आणि सरळ पै यांच्या दुकानात शिरले. या दुकानाचे दोन कप्पे असून पहिल्या कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात जाताना काचेच्या कपाटांची नासधूस झाली. मात्र कोणत्या बाजूने हे रानडुक्कर पसार झाले याचा थांगपत्ता लागू शकला नाही.
या अकस्मात घडलेल्या नाट्यामुळे चावडीवरील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पै यांच्या दुकानानंतर त्यांच्या दुकानासमोर असलेल्या पै खोत यांच्या दुकानात शिरण्याची तयारी हा कळप करत होता, अशी माहिती या ठिकाणी असलेल्या काही बघ्यांनी तसेच सदर दुकानाच्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांनी दिली. ही घटना घडल्यानंतर माजी आमदार विजय पै खोत यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि रानटी श्वापदे गावात फिरू लागण्याच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.