लहानपणी केली जायची चेष्टा
माणसाच्या कमजोरीची चेष्टा करण्यापूर्वी त्याच्या परिस्थितीबद्दल विचार केला जावा. एली डेव्हिस नावाच्या मुलीची बालपणी तिच्या तिरळय़ा नजरेमुळे थट्टा उडविली जात होती. परंतु आता एली स्वतःच्या या तिरळय़ा नजरेद्वारे लाखो रुपये कमावत आहे. तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्समध्ये दिग्गज व्यक्ती सामील असून ते एलीच्या हिमतीचे कौतुक करत आहेत.
टिकटॉक सेंसेशन ठरलेली एली डेव्हिस तिरळय़ा नजरेची आहे. एलीला शाळेत यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु आता 18 वर्षांची एली स्वतःच्या याच डोळय़ामुळे इंटरनेटवर प्रसिद्ध आहे. एली सध्या ब्युटी थेरेपीचे शिक्षण घेत असून नाइटक्लबमध्ये पार्टटाइम शॉट गर्ल म्हणून देखील काम करते. परंतु किशोरवयात एलीमध्ये इतका आत्मविश्वास नव्हता आणि ती स्वतःच्या आय टर्नमुळे निराश असायची.
वयाच्या चौथ्या वर्षापासून तिच्यात ही समस्या दिसून येत होती. अधिक थकल्यावर तिच्या डोळय़ातील तिरळेपणा अधिकच दिसून यायचा. काही दिवसांपर्यंत लोकांच्या टोमण्यांना वैतागून तिने चष्मा वापरणे सुरू केले होते. परंतु आता ती असे करत नाही. एकेकाळी आत्मविश्वास गमावलेली एलीने आता स्वतःच्या याच कमजोरीला अटेंशन मिळविण्याचे माध्यम केले आहे.
ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणाऱया एलीने टिकटॉक जॉइन केल्यापासून तिला पसंत करणाऱयांची संख्या लाखोंमध्ये पोहोचली आहे. तिचे 2 लाख 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झाली आहे. भविष्यात मॉडेल व्हायचे असल्याचे तिने म्हटले आहे.
एली स्वतःच्या डोळय़ांच्या मेकअपची छायाचित्रे टिकटॉकसह इन्स्टाग्रामवरही अपलोड करते. मेकअप टय़ुटोरियलपासुन गाणी आणि नृत्याच्या चित्रफिती ती आता पोस्ट करत असते. ब्रिटनमधील काही प्रख्यात व्यक्ती तिच्या चित्रफितींवर कॉमेंट करत असतात.