सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ‘एपीईसी’दरम्यान होणार भेट
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (एपीईसी) फोरम शिखर परिषदेपूर्वी भेटणार आहेत. द्वयींमधील या भेटीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. या सर्वोच्च बैठकीत दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासूनच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये अधिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा आहे.
शी जिनपिंग यांनी 2017 मध्ये अमेरिकेला शेवटची भेट दिली होती. आता ‘एपीईसी’च्या निमित्ताने ते सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचले असून दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी थेट चर्चा होणार आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांच्या नेत्यांच्या बैठकीचा जगावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत दोन्ही नेत्यांमधील चर्चेकडे अनेक देश औत्सुक्याने पाहत आहेत. अलीकडच्या काळात चीनची अर्थव्यवस्था घसरली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीत अमेरिकेची स्थिती थोडी मजबूत झाली आहे.
बायडेन-जिनपिंग शिखर परिषदेचा उद्देश संवादाला चालना देणे हा असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. या बैठकीत मध्यपूर्वेतील संघर्षापासून रशिया-युव्रेन युद्ध, उत्तर कोरियाचे रशिया, तैवान यांच्याशी असलेले संबंध, मानवाधिकार, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच न्याय्य व्यापार आणि आर्थिक संबंध अशा जागतिक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्मयता आहे. जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यातील या वर्षातील ही दुसरी द्विपक्षीय बैठक आहे. तत्पूर्वी, इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 बैठकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती.