जगातील सर्वात वृद्ध पक्ष्याचे वय किती असेल असा कधी विचार केला आहे का? सोशल मीडियावर एका पक्ष्याच्या छायाचित्राची सध्या चर्चा होत आहे. लेसन अलबाट्रोस प्रजातीच्या या पक्ष्याचे नाव विजडम असून त्याला ‘युएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस पॅसिफिक’ने जगातील सर्वात वृद्ध पक्षी ठरविले आहे. हा पक्षी अलिकडेच अमेरिकेत परतला आहे.
वन्यजीव अधिकाऱयांनुसार या पक्ष्याचे वय कमीतकमी 71 वर्षे आहे. या पक्ष्याचे वय जाणून घेतल्यावर सोशल मीडिया युजर्स दंग झाले आहेत. हा पक्षी तर माझ्या आजीआजोबांपेक्षाही अधिक वयाचा आहे अशी टिप्पणी एका युजरने केली आहे.
हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. याच्या कॅप्शनमध्ये विजडम नावाचा हा मादी पक्षी जगातील सर्वात वृद्ध पक्षी असून तो अलिकडेच अमेरिकेच्या ‘मिडवे अटॉल नॅशनल वाईल्डलाइफ रिफ्यूजमध्ये परतला आहे’ असे नमूद कण्यात आले आहे. लेसन अलबाट्रोस प्रजातीच्या या पक्ष्याचे वय किमान 71 वर्षे आहे. जीवशास्त्रज्ञांनी 1956 मध्ये पहिल्यांदा ‘विजडम’चा शोध लावला आणि त्याचे बँडिंग केले होते. या पक्ष्यासंबंधीच्या ट्विटला आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
विजडमला त्याचा प्रसिद्ध बँड क्रमांक झेड333 द्वारे ओळखले जाते. या पक्ष्याला पहिल्यांदा थँक्सगिव्हिंग डेवेळी पाहिले गेले होते. त्याच्यासोबत दीर्घकाळ घालविणाऱया साझी पक्ष्याला सध्या पाहिले गेले नाही. तो मागील नेस्टिंग सीझनमध्येही गायब होता. तसेही नर पक्षी सर्वप्रथम प्रजननस्थळी परततात. विजडमने स्वतःच्या आयुष्यात आतापर्यंत 30 हून अधिक पिल्लांना जन्म दिल्याचा अनुमान वर्तविण्यात आला आहे.