मात्र, न्याय मिळाला नाही, तर नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आपल्या कामावर परतले आहेत. मात्र, न्याय मिळेपर्यंत आंदोलन होतच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आपण आंदोलन मागे घेतले असल्याचे वृत्त नाकारत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच न्यायाच्या वाटेत नोकरी आडवी आल्यास नोकरीचा राजीनामा देऊन आंदोलन सुरु ठेवले जाईल, असे प्रतिपादन विनेश फोगाट आणि पुनिया यांनी केले आहे.
साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या कुस्तीपटूंनी सोमवारी रेल्वेतील त्यांच्या कामावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती विशेष अधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यांनी आता आपल्या कामाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले असे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले. तथापि, आंदोलन मागे घेतले नसून मागण्या मान्य होईपर्यंत ते सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कुस्तीपटूंनी केली आहे.
अमित शहांशी भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या कुस्तीपटूंची भेट झाली होती. आमची शहा यांच्याशी सर्वसामान्य चर्चा झाली. ब्रिजभूषण सिंग यांना अटक करा, ही आमची एकच मागणी आहे. ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार आहे. आम्ही आंदोलनातून माघार घेतलेली नाही, असे साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांच्या ट्विटर संदेशांच्या माध्यमातून लोकांसमोर स्पष्ट केले आहे.
सिंग यांच्यावरील आरोप
काही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरणसिंग यांच्याविरोधात शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांकडे सादर केलेल्या तक्रारींमध्येही हे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारींसंबंधी चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दिली होती. मात्र, सिंग यांनी ते नाकारले आहेत.
खाप पंचायतींचा पाठिंबा
पंजाब आणि हरियाणातील अनेक खाप पंचायतींनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कुस्तीपटूंनी काही दिवसांपूर्वी त्यांची सर्व पदके गंगार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते हरिद्वारपर्यंत पोहचलेही होते. पण काही शेतकरी नेत्यांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले होते. आता पुढे आंदोलनाचे काय होणार यासंबंधी उत्सुकता आहे. कुस्तीपटू कामावर परतल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.