वेर्णा चौपदरी महामार्गावरील घटना
वार्ताहर /झुआरीनगर
वेर्णातील चौपदरी महामार्गावर किया शोरूमजवळ पार्क करून ठेवलेल्या एका ट्रेलरला दुचाकीची धडक बसून दाबोळीतील अनुप देविदास सावळ (28) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री नऊच्या दरम्यान झाला.
मयत अनुप हा आपल्या ऍक्टीवा दुचाकीने वेर्णाच्या दिशेने जात असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व तो सरळ महामार्गाच्या बाजुने पार्क केलेल्या ट्रेलरला धडकला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, तो जागीच ठार झाला. त्याचा चेहरा ओळखण्या पलिकडे होता. तसेच शरीरावरही अनेक जखमा झाल्या. पाऊसामुळे त्याचे स्कुटरवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह हॉस्पिसियोमध्ये पाठवून दिला. तसेच या महामार्गाच्याजवळ असलेला तो ट्रेलरही हटविला. उपनिरीक्षक संकेत तळकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
महामार्गावरील बेजबबदार पार्कींगमुळे आतापर्यंत अनेकांचा बळी झुआरीनगरातील एम.ई.एस. नाका ते बिर्ला क्रॉस जंक्शनपर्यंत अनेक अवजड वाहने रस्त्याच्या बाजुने बेकायदेशीरपणे पार्क करून ठेवलेली असतात. अपघाताला कारण ठरलेला ट्रेलर गेल्या कित्येक दिवसांपासून बेजबाबदारपणे या जागी पार्क करून ठेवलेला होता. जर हा ट्रेलर या जागी नसता तर त्या युवकाचा प्राण वाचला असता अशी हळहळ घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. बीर्ला क्रॉस जंक्शनवरही अशीच कित्येक मोठी वाहने महामार्गावरच पार्क करून चालक आपल्या इतर कामासाठी जात असतात. अशा बेशिस्तपणे पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. या महामार्गावर दाबोळीपासून वेर्णापर्यंत अनेक ठिकाणी अशा प्रकारे टँकर, ट्रेलर, अन्य मालवाहू ट्रक पार्क करण्यात येतातत. या महामार्गा या अवजड वाहनांना धडक दिल्याने आतापर्यंत अनेकांचा बळी गेलेला आहे. हल्लीच लागोपाठ अशा प्रकारचे तीन अपघात झालेले असून त्यात चार जणांचा बळी गेलेला आहे.