पुलाची शिरोली/ वार्ताहर
बांधकामाच्या ठिकाणी असणारे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सेंट्रींगचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. नागावचे सेंट्रींग कामाचे ठेकेदार मंगेश राठोड यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे असणाऱ्या हुबाळे पाणंद येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सांगली फाटा येथील हुबाळे पाणंद येथे गोडाऊनचे आरसीसी बांधकाम सुरू आहे. बांधकाम ठेकेदार मंगेश राठोड यांच्याकडून या कामाच्या ठिकाणी स्लॅब जोडण्याचे काम सुरू होते. यापैकी सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी सेंट्रींगसाठी लागणारे साहित्य अपुरे पडत होते. त्यामुळे त्यांनी हे साहित्य कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाकडून भाड्याने आणण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी स्लॅब जोडण्यासाठी ४६ नग सपोर्ट पाईप व २१ नग कैची असे लोखंडी साहित्य भाड्याने आणले होते. अवघ्या पाच तासातच रात्री अकरा वाजता अज्ञात तीन व्यक्तींनी पिकअप गाडीतून हे साहित्य चोरुन नेले. यासंदर्भात प्रमुख मार्गावरील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा माल घेऊन जाणारी पीकअप सांगली फाटा येथे वळण घेऊन विरूध्द दिशेने सेवा मार्गावरुन शिरोली गावात गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.