पुणे / प्रतिनिधी :
एका लग्नसोहळा असलेल्या घरातून नातेवाईकांच्या पिशवीतून दोन लाख पाच हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अन्सार कच्छी (वय 32, रा. बुधवार पेठ, कराड, जि. सातारा) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार अन्सार कच्छी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. अन्सार कच्छी यांचे नातेवाईक अहमद हसन कच्छी कोंढव्यातील गॅलेक्सी प्रिमिअर सोसायटीत राहायला आहे. अहमद कच्छी यांच्या नात्यातील एका विवाहासाठी अन्सार कच्छी आणि त्यांची आई आली होती. अन्सार यांनी लग्नघरात कपडे, दागिने असलेली पिशवी ठेवली होती. पिशवीतून दोन लाख पाच हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करत आहेत.