गोवा वाहतूक पोलीस विभागाचा सक्त इशारा, 18 वर्षांखालील वाहन चालकांवर कारवाई सुरु
प्रतिनिधी/ पणजी
वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापुर्वी मुलांनी वाहने चालवल्यास त्यांच्या पालकांना नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रु. 25,000 एवढय़ा मोठय़ा रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस विभागाने दिला आहे. त्याशिवाय 18 वर्षापूर्वीच वाहन चालवताना सापडल्यास त्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच मुले दुचाकी, चारचाकी वाहने चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो आणि तो असूच शकत नाही. कारण 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वाहन परवाने देण्यात येतात. त्यासाठी वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातातून 18 वर्षाखालील लहान वयाची मुले वाहने चालवतात हे सत्य उघड झाले आहे. त्यांना पालक वाहने घेऊन देतात किंवा ते पालकांची किंवा इतरांची वाहने घेऊन ती चालवतात असेही समोर आले आहे. त्यावर वचक ठेवण्यासाठी आता वरीलप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
विनापरवाना वाहने चालवण्याचे प्रकारही राज्यात मोठय़ा प्रमाणात वाढले असून तपासणीत ते सत्य समोर आले आहे. अपघातात 18 वर्षाखालील अनेक मुलांचे बळी गेले आहेत. ते आणखी वाढू नयेत म्हणून वरीलप्रमाणे कारवाई करण्याचे वाहतूक पोलिसांनी ठरवले आहे. या प्रकरणी पालकांना 3 वर्षाचा कारावासही होऊ शकतो असे वाहतूक पोलिसांनी बजावले आहे. नवीन मोटर वाहन कायद्याची अमंलबजावणी गोव्यात सुरु झाली असून पालकांनी तसेच 18 वर्षाखालील मुलांनी याची नोंद घ्यावी, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.