सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्यानंतर सोमवारपासून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी घेणार असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय देणार आहेत. त्यामुळं शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची धाकधूक वाढली आहे.
राहुल नार्वेकर यांनी बंडखोर आमदारांना अपात्र केल्यास एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही हे सांगता येत नाही,” असं विधान केले आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भविष्यात काय होईल, हे कुणालाच माहित नसतं, असं सूचक वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या याचिकांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना देताना एक आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करत त्याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. कालपासून विधानसभा सचिवालयाकडून सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या 14, तर शिंदे गटाच्या 39 आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्र प्रकरणी आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि आमदार अपात्रबाबत प्रकरण सुरू होते मात्र आता विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू होत आहे. यापूर्वी न्यायालय तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा मान विरोधकांनी राखला मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत ही सुनावणी होत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र केल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. त्यामुळं शिंदे अपात्र झाल्यास महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. त्यासाठी भाजपने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर भाजपकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यास यापैकी एका नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांच्याबाबत सुनावणी करताना शिवसेनेच्या बाजुने असलेली सहानुभुती तसेच शिवसेना फोडण्यात भाजपची असलेली महत्त्वाची भूमिका हा जो आरोप भाजपवर वारंवार केला जात आहे, त्याबाबत शिंदे गटा विरोधात निर्णय देऊन शिवसेनेच्या बाजूने असलेली सहानुभुती कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2022 ला म्हणजेच गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले असता त्यांनी राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. आता वेळ आली आहे, उध्दव ठाकरेंना जमीन दाखवण्याची, असे ठणकावून सांगताना ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र तेच शहा परवा मुंबईत गणपती दर्शनाला आले असता मात्र त्यांनी शिवसेनेविरोधात किंवा उध्दव ठाकरेंविरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही. भाजप विरोधी इंडिया आघाडीत उध्दव ठाकरेंनी घेतलेली भूमिका मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठाकरेंचे वाढलेले महत्त्व यामुळे गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यामुळेच की काय शहा यांनी शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलणेच टाळले. मात्र त्याचदिवशी अमित शहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर 45 मिनिटे झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेत आमदार अपात्र सुनावणीबाबतही चर्चा झाली असल्याचे समजते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून 48 जागांवर विजय मिळविण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली असून 48 पैकी भाजपचे खासदार असलेल्या काही जागांवर बदल होण्याची शक्यता असून शिंदे गटातील खासदारही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून अॅड. उज्वल निकम, पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन ते तीन टर्म खासदार असलेल्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका, मराठा आरक्षणाचा विषय तसेच धनगर समाजाने एसटीत समावेश करण्यासाठी राज्यभर घेतलेला आक्रमक पवित्रा तर ओबीसी समाजाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन न मागे घेण्याचा दिलेला इशारा बघता राज्यात सरकार विरोधी असलेले वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर झालेला अमित शहा यांचा मुंबई दौरा पाहता महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ म्हणजेच नवरात्राआधीच घट उठणार असल्याची चर्चा आहे. 16 बंडखोर आमदारांना जर विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार म्हणजेच त्यांचा घट नवरात्राआधीच उठणार अशी चर्चा आहे तर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र केल्यास उध्दव ठाकरेंचा वडिलांच्या पक्षावर म्हणजेच शिवसेनेवर दावा भक्कम होणार आहे.
प्रवीण काळे