लोकांची खोड ठरली परंपरा
च्युइंगम खाणे अनेक लोकांना आवडते, परंतु त्याची विल्हेवाट लावणे सोपे नसते. फारच कमी लोक च्युइंगम एखाद्या कागदात गुंडाळून तो कचरापेटीत टाकत असतात. परंतु अमेरिकेत एक भिंत आहे, जेथे लोक लपून नव्हे तर उघडपणे च्युइंगम चिकटवून जात असतात. या कारणामुळे ही भिंत आता च्युइंगमने भरून गेली आहे. यावर हजारो च्युइंगम चिकटलेले आहेत. यामुळे या भिंतीला सर्वाधिक किटाणूयुक्त जागा म्हणूनही पाहिले जाते.
वॉशिंग्टनच्या सिएटलमध्ये वॉल ऑफ गम किंवा गम वॉल नावाने ही भिंत आहे. ही भिंत पाहिल्यावर तुम्ही चकितच व्हाल. या भिंतीवर लोकांनी चघळलेले च्युइंगम हजारोंच्या संख्येत चिकटविले आहेत. या कारणामुळे या भिंतीला सर्वाधिक किटाणू असलेल्या जागेत समाविष्ट करण्यात आले आहे. या भिंतीची उंची 8 फूट असून ती 50 फूट लांब आहे.
ही भिंत मार्केट थिएटरनजीक आहे. 1993 पासून या भिंतीवर च्युइंगम चिकटविण्याची परंपरा सुरू झाली. तिकीटधारक रांगेत उभे राहू आत जाण्याची प्रतीक्षा करायचे. या प्रतीक्षेदरम्यान कंटाळल्यावर ते या भिंतीवर च्युइंगम चिकटवू लागले. हळूहळू येथून जाणारे लोक देखील भिंतीवर च्युइंगम चिकटविण्याचा प्रकार करू लागले होते. आता हे ठिकाण जणू पर्यटनस्थळच ठरले आहे. 2009 मध्ये प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनचा चित्रपट ‘लव्ह हॅपन्स’मध्ये या भंतीचे दृश्य दाखविण्यात आले होते, ज्यात अभिनेत्री भिंतीवर च्युइंगम चिकटविताना दिसून आली होती.
तेव्हापासून येथे हजारो लोक येऊ लागले आणि च्युइंगम चिकटवू लागले. परंतु 2015 मध्ये ही भिंत पूर्णपणे साफ करण्यात आली होती. कामगारांना याकरता 130 तासांचा कालावधी लागला होता आणि 1 टनापेक्षा अधिक च्युइंगम हटवावे लागले होते. त्यानंतर भिंत 2018 मध्ये पुन्हा साफ करण्यात आली, परंतु केवळ 5 महिन्यांमध्ये या भिंतीने पुन्हा स्वत:चे जुने रुप धारण केले. प्रारंभी लोक केवळ मजा म्हणून येथे च्युइंगम चिकटवत होते, दुकानदार त्यांना रोखत होते, परंतु आता येथे च्युइंगम चिकटविणे प्रथाच ठरली आहे. प्रेमी जोडपे स्वत:च्या प्रेमाला अमर करण्याच्या कल्पनेसोबत येथे येत च्युइंगम चिकटवत आहेत.