गुलाम नबी आझाद यांच्याकडून प्रशंसा, काँगेसवर टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसमधून बंड करुन बाहेर पडलेले काश्मीरी नेते गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी कधीही सूडभावनेनेने काम करत नाहीत. त्यांची वर्तणूक एखाद्या समंजस आणि प्रौढ राजकीय नेत्याप्रमाणे आहे, असे प्रतिपादन आझाद यांनी मंगळवारी केले.
आज बुधवारी आझाद यांचे आत्मचरित्र ‘आझाद’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे. या पुस्तकाचे प्रकाशन काँगेस नेते आणि आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. करणसिंग यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकात आझाद यांनी त्यांचा 55 वर्षांचा राजकीय जीवनपट उलगडला आहे. या कार्यक्रमाच्या आधी 1 दिवस ते एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते. त्यांनी काँगेसवर टीका केली.
रमेश अनुपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ केला. त्यांनी तसा प्रस्ताव राज्यसभेत आणला. त्यावेळी विरोधी पक्षांनी या प्रस्तावाविरोधात धरणे धरले होते. जयराम रमेश त्यावेळी राज्यसभेत काँगेसचे मुख्य प्रतोद होते. पण ते धरणे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, अशी आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.
संतप्त प्रतिक्रिया
ज्यावेळी अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि राज्याची विभागणी तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्याचे विधेयक मांडले, तेव्हा मी माझा मायक्रोफोन काढून फेकला आणि त्वरित राज्यसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाऊन धरणे दिले. मी त्यावेळी काँगेसमध्ये होतो. मी एकटय़ानेच या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. काँगेस पक्षाने मात्र तेव्हढा उत्साह दाखविला नाही, अशा अर्थाचे प्रतिपादनही त्यांच्या आत्मचरित्रात आहे.